भाईंदर/ विजय काते : काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदर शहरात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद मोठ्या प्रमाणावर चिघळला होता. या वादात मनसेचे नेते अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष संदीप राणे यांनी थेट भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समाजमाध्यमांवर तसेच जाहीर कार्यक्रमांमध्ये मनसे नेत्यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढा दिल्याचे भासवत, भाजप आमदार मेहतांवर ‘मराठी विरुद्ध हिंदी वाद भडकवल्याचा’ ठपका ठेवला होता.
मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मनसेचेच संदीप राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हेच तिन्ही नेते अविनाश जाधव, संदीप राणे आणि नरेंद्र मेहता एकाच व्यासपीठावर एकमेकांच्या शेजारी बसलेले पाहायला मिळाले. यामुळे जनतेमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून मनसेच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झगडतो असा आव आणणाऱ्या मनसेने एका बाजूला भाजप आमदारांवर आरोप करायचे, तर दुसऱ्या बाजूला त्याच नेत्यांना स्वतःच्या वाढदिवसाला आमंत्रण देऊन स्वागत करायचे ही ‘दुटप्पी भूमिका’ जनतेच्या लक्षात येऊ लागली आहे. ज्या आमदारांवर आरोप झाले, ते नरेंद्र मेहता देखील कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय वाढदिवसाच्या मंचावर उपस्थित राहतात, हे देखील तेवढेच प्रश्न निर्माण करणारे आहे.मीरा-भाईंदरच्या जनतेला या राजकीय नेत्यांनी केवळ मतांसाठी ‘वेड्यात’ काढण्याचा प्रकार तर घडत नाही ना, अशी शंका जनतेत व्यक्त होत आहे.
राजकीय स्वार्थ की जनतेची फसवणूक?
मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम संघर्ष निर्माण करणे, समाजात तणाव निर्माण करणे आणि त्यातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न हेच काही राजकीय पक्षांचे सूत्र बनले असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत मनसेसारखा पक्ष, जो स्वतःला मराठी अस्मितेचा झेंडा घेऊन फिरतो, त्याच्याच भूमिकेतील विसंगती जनतेच्या मनात नाराजी व अविश्वास निर्माण करत आहे.वास्तविकता ही आहे की, मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता यांचा राजकीय नेत्यांकडून केवळ उपयोग होतोय वापर नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने मंचावर ‘वादाचे सूत्रधार’ एकत्र येणं, हे स्पष्ट दाखवून देतं की संघर्ष खरा नसून केवळ नाटकी सोंग आहे असा संभ्रम नागरिकांनी व्यक्त केला आहे.