मीरा-भाईंदर / विजय काते : मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन विभागाचे (MBMTC) कर्मचारी आज अचानक संपावर गेल्याने शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळच्या वेळेस कामावर जाणाऱ्या चाकरमानींची मोठी गैरसोय झाली आहे.मिरारोड रेल्वे स्टेशन परिसरात सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या असून, बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना रिक्षा व खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे प्रवास खर्चात मोठी वाढ झाली असून अनेक नागरिक उशिरा कार्यालयात पोहोचले.
संपाबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याचे सूत्रांकडून समजते. नागरिकांनी लवकरात लवकर बस सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा जनतेला वेठीस धरणाऱ्या संघटनांवर कारवाई करा!परिवहन कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय मागण्या चर्चेतून मार्गी लावणे आवश्यक आहे, ही वस्तुस्थिती आम्हाला मान्य आहे. मात्र, मिरा – भाईंदरमधील सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकत, बेकायदेशीररित्या संप पुकारून राजकीय स्वार्थासाठी नागरिकांना वेठीस धरणे हे कदापिही सहन केले जाणार नाही.
या पार्श्वभूमीवर, अशा अराजक निर्माण करणाऱ्या संघटनांवर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना दिल्या आहेत.सरकार जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अडवून अराजक माजवणाऱ्यांना योग्य ते कायदेशीर प्रतिउत्तर दिले जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील बसेस आता नागरिकांच्या जिवावर उठल्या असल्याचं चित्र आहे. अनेक बसगाड्या अक्षरशः धूर ओकत रस्त्यावर धावताना दिसत आहेत. काहींचे दरवाजे तुटलेले आहेत, काही गाड्यांचा पत्रा सडलेला आहे, तर काहींमध्ये खिळखिळे भाग वेगाने हलताना दिसतात. या गाड्यांमधून प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखं झालं आहे. आधीच बसगाड्यांची झालेली दुर्दशा आणि आता परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.