Assembly Speaker Rahul Narvekar Press Conference on Ministerial Opportunity in maharashtra government
मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या (Shivsena MLA) अपात्रतेबद्दलची सुनावणी गुरुवारी दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर होणार आहे. दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे जमा करण्याची मुदत बुधवारी संध्याकाळी चार वाजता संपली आहे. त्यानंतर यासंबधित १४ याचिकांचे सहा गट तयार करून त्यावर सुनावणी होणार आहे.
त्या आधीच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्लीला गेले आहेत. आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी गुरुवारी दुपारी ४ वाजता विधानभवनात पार पडणार आहे. या सुनावणीत वर्गवारी करण्यात आली असून, १४ वेगवेगळ्या याचिका आता यापुढे ६ गटात मांडल्या जातील. ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देत आहे. त्यामुळे ही सुनावणी लांबत आहे, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी गेल्या सुनावणीवेळी म्हटले होते.
जर अजून अर्ज येत राहिले तर सुनावणी लांब जाईल. सर्वोच्च न्यायालयातील याचिका वेगळी आहे. इथली याचिका वेगळी आहे. हे ट्रिब्यूनल अर्थात लवाद आहे. इथे प्रक्रिया आहे, इथे ट्रायल होते, असे नार्वेकर म्हणाले होते.
राहुल नार्वेकरांची ठाकरे गटावर नाराजी
नार्वेकर यांनी गेल्या सुनावणीवेळी नाराजी व्यक्त केली होती. दरवेळेस वेगवेगळ्या याचिका दाखल केले जातात. त्यात वेळ घालवला जातो. येथे एक भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयात वेगळी भूमिका का घेता, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला केला. जर मी सुनावणी घेत आहे तर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे माझ्यासमोर सादर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या.