
"निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय...", दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
मुंबई : महापालिका निवडणुकीपूर्वी झालेली बिनविरोध नगरसेवकांची निवड आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव दिसतोय, अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी उबाठा खासदार संजय राऊत यांच्यावर केली. यावेळी शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी उपस्थित होत्या.
आमदार केसरकर पुढे म्हणाले की निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेणाऱ्यांना पराभव दिसत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांचीही आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली होती, तेव्हा आक्षेप का नाही घेतला, असा सवाल केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला. निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांनी तब्ब्येतीची पुन्हा तपासणी करावी, असा टोला केसरकर यांनी यावेळी लगावला. निवडणुका जवळ आल्या की मतासाठी मराठी माणसाचे नाव घ्यायचे आणि एरव्ही विसरायचे, या वृत्तीमुळे मुंबईतील मराठी माणूस वसई विरार, कल्याणमध्ये गेला, अशी टीका आमदार केसरकर यांनी उबाठावर केली.
आमदार केसरकर म्हणाले की, अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कोस्टल रोड, मेट्रो, अटल सेतू याचे काम पूर्ण का नाही केले. मुंबईत जी विकास कामे झाले त्याचे श्रेय घ्यायचं, खोटं बोलायचं आणि तेही रेटून बोलायचं अशी टीका केसरकर यांनी केली. मराठी माणसांच्या घरांच्या योजना अर्धवट राहिल्या. याला जबाबदार कोण, असा सवाल केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य दुर्देवी आणि कोकणकर जनतेचा अपमान करणारे आहे, असे केसरकर म्हणाले. कोकण नेहमी बाळासाहेबांच्या विचारांसोबत राहिले. त्यामुळे ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तिथं कोकणातून उबाठा हद्दपार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्याचे काम केले. नौदलाचे बोधचिन्ह हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन तयार केले आहे, हा महाराजांचा गौरव आहे असे केसरकर म्हणाले. ही निवडणूक मुंबईची आहे गुजरातची नाही. ज्याप्रकारे विधानसभेत जनतेनं उबाठाला जागा दाखवली तशा प्रकारे महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा जनता त्यांना जागा दाखवेल, असे केसरकर म्हणाले.
मागील २५ वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता असताना उबाठाने मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे काम केले. मात्र मुंबईला खड्डेमुक्त करण्याचा निर्णय शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले, अशी माहिती शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी यांनी दिली. २०२७ पर्यंत मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण होईल, असे शायना एन.सी यांनी यावेळी सांगितले.