मुंबई: सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तर विधिमंडळ परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले आहेत.यावर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी घडलेल्या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले आमदार जितेंद्र आव्हाड?
विधानसभेत आमदारच सुरक्षित नाहीत. विधानभवनात गुंडांना प्रवेश का देता? मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या गेल्या आहेत. कुत्रा, डुक्कर असं बरेच काही लिहिले आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर, विधानसभेत आमदार सुरक्षित नसतील तर कशाला आमदार राहायचे? कुणीतरी मवाल्यासारखा येतो, आई-बहिणीवरून शिव्या देतो. आमचा नक्की गुन्हा तरी काय आहे?
Gopichand Padalkar: विधिमंडळातील राड्यावर पडळकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “घडलेली घटना ही…”
काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर?
विधानसभेच्या परिसरात जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. विधानसभेचा सदस्य म्हणून मला याचे अतीव दुःख आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती यांची दिलगिरी व्यक्त करतो. याविषयी आमच्या नेते मंडळींशी चर्चा करून सविस्तर बोलतो.
नेमके घडले काय?
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले आहेत. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. या प्रकरणाचा तातडीने अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
काल आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार राडा झाला होता. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ देखील झाल्याचे समोर आले होते. ते प्रकरण नुकतेच घडले असताना पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचा विधानभवन परिसरात जोरदार राडा झाला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली आहे. एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत मजल गेल्याचे पाहायला मिळाले.
विधानभवनाच्या परिसरात पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये हा जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विधानभवनात गोंधळ निर्माण झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.