
MLA Satyajit Tambe aggressive as history of Chhatrapati Shivaji Maharaj 68 words in CBSE
नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून यावेळी राज्यातील विविध विषयांवर चर्चा आणि भाष्य केले जात आहेत. यामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी कमी शब्दांत शिकवला जात असल्याची बाब नजरते आणून दिली आहे. सत्यजीत तांबे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास CBSE च्या इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात केवळ 68 शब्दांत गुंडाळण्यात आला आहे. याबाबत मी मागील अधिवेशनात दिनांक 18 जुलै 2025 रोजी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळ मंत्री महोदयांनी आपण दिल्लीत जाऊन याचा पाठपुरावा करू असा शब्द दिला होता, मात्र अजूनही याबाबत काहीही कार्यवाही झाली नाही,” असा मुद्दा तांबे यांनी सभागृहात मांडला.
हे देखील वाचा : गिरीश महाजनांना मस्ती आलीये..; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी घेतला खरपूस समाचार
“छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास देशाच्या भावी पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे! छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या इतिहासाला व भूगोलाला आकार दिला. जगाच्या पटलावर उदयास आलेल्या, संपूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवला पाहिजे,” अशी भूमिका सत्यजित तांबे यांनी घेतली.
तर महाराष्ट्र शासनाने स्वतः हा इतिहास लिहून…
पुढे ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहितदक्ष राजे होते, उत्तम प्रशासक होते, त्यांनी 18 पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभारले. भारतीय उपखंडातील इतर राजे, महाराजे भव्य महाल उभारण्यात व्यस्त असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी महाल न उभारता स्वराज्य उभारले. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, वृक्षतोड करू नये इतकी दूरदृष्टी त्यांनी आपल्या प्रशासनात पेरली. हा सगळा इतिहास 68 शब्दांत कसा काय मांडला जाऊ शकतो ?जर CBSE ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल पुरेशी माहिती नसेल तर महाराष्ट्र शासनाने स्वतः हा इतिहास लिहून CBSE कडे दिला पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका आमदार सत्यजित तांबे यांनी घेतली.
हे देखील वाचा : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत
महाराष्ट्राचे हे उदासीन धोरण दुर्दैवी
त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक आणि गडकिल्ल्यांबाबतही सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, “अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली होती, स्वतः पंतप्रधानांच्या हस्ते याचा भव्य सोहळाही करण्यात आला, मात्र त्यानंतर या स्मारकाच्या बाबतीत काहीही प्रगती झाली नाही. संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबाबतही अशीच अक्षम्य दिरंगाई झाली, जिल्हा नियोजन निधीतून हे काम शक्य असताना विनाकारण नगर विकास विभागाकडे हा विषय गेला. जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार होत असताना, त्यांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्राचे हे उदासीन धोरण दुर्दैवी आहे.” अशा शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली.