MNS issues official letter on Pune PMC Commissioner Bungalow theft case
MNS VS PMC : पुणे : पुणे महापालिका आयुक्तांच्या घरातील सामान चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यावरुन आता मनसे आणि पालिकेमध्ये वाद निर्माण झाला आहे. पालिका आयुक्तांच्या घरातील अनेक किमती वस्तूंची चोरी झाल्याचे समोर आले आहे. यानंतर जवळपास 20 लाखांचे सामान पुन्हा घेण्यात येत असल्यामुळे मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यावरुन पालिका आय़ुक्त नवल किशोर राम आणि मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यानंतर आता मनसेने अधिकृत पत्र जारी करत माहिती दिली आहे.
काय आहे मनसेच्या पत्रामध्ये?
मनसेच्या पुणे पदाधिकारी आणि पालिका आयुक्त नवल किशोर राम व कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. यानंतर आता मनसेने अधिकृत भूमिका मांडली आहे. यामध्ये लिहिले आहे की, “पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तचे वासव्य असलेल्या बंगल्यातील अनेक वस्तु चोरीला गेल्याचे वर्तमान पत्रातील बातमीतून समजले. यामध्ये एअर कंडीशन, झुंबर, टी व्ही असे लाखो रुपये किंमतीचे साहित्य चोरीला जाते यावर सामान्य पुणेकरांनी विश्वास कसा ठेवायचा. बंगल्यातून साहित्य गायब होते या बंगल्या भोवती कडक सुरक्षा व्यवस्था असूनही चोरी होते. आता चोरी कोणी केली हे पण सी सी टी व्ही कॅमेरे तपासले तर समजू शकते पण कुंपणच शेत खाते का?” असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “किंवा यात चोरी कोणी केली याचा तपास करायचा नाही. कारण या विषयात पुणे महानगर पालिका प्रशासनाने पोलीस तक्रार देण्याची पण तत्परता दाखवली नाही. यात पूर्वीचे सेवा निवृत्त झालेले आयुक्त हे साहित्य आपलीच मालमत्ता समजून तर घेऊन गेले नाहीत ना? याचा पण शोध घेणे गरजेचे आहे. 20 लाख रुपये किमतीचे पुणेकरांच्या कररुपी पैशाची चोरी होऊनही प्रशासन गप्प का?या घटनेची पोलीस तक्रार पण नाही या प्रकरणात कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न आयुक्त तर करीत नाही ना? अशी शंका मनात येते,” असा आक्रमक पवित्रा मनसे नेत्यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे लिहिले आहे की, “कारण या पूर्वी पण महापौर बंगल्यात चोरी झाली होती त्याचा पण तपास झालेला नाही. सदरच्या पत्राद्वारे मागणी करण्यात येते कि पुणे महानगर पालिकेच्या आयुक्त बंगल्यात झालेल्या चोरीची पोलीस तक्रार देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून चोराला शासन करण्यात यावे,” अशी मागणी पुणे मनसेकडून करण्यात आली आहे.
नेमकं झालं काय?
पुणे आयुक्तांनी बुधवारी आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वच्छतेच्या संदर्भात बैठक आयोजित केली. या बैठकमध्ये मनसे नेते व माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि पक्षाचे पदाधिकारी शिरले. त्यावेळी दोघांत वाद झाला. शिंदे हे आयुक्तांच्या अंगावर धावून गेले असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. तर आयुक्तांनी मला आणि मराठी माणसांना गुंड असे संबोधले, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. शिंदे हे बैठकीत आल्यानंतर आयुक्तांनी त्यांना तुमचे काम काय आहे? असा प्रश्न विचारला. तेव्हा शिंदे यांनी मी माजी नगरसेवक आहे, असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी पुन्हा प्रश्न विचारल्याने शिंदे हे संतप्त झाले आणि वादाला सुरुवात झाली. त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शिंदे यांना रोखले. यावेळी आयुक्त राम यांनी ‘आप बाहर निकल जाओ’ असे हिंदीत म्हटल्यावर शिंदे यांनी त्यास आक्षेप घेत तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठीत बोला ! अशी मागणी केली. यातून वाद वाढल्याने ‘मी तुला बाहेर पाठवीन’ अशी शिंदे यांनी धमकी दिली. हा प्रकार झाल्यानंतर शिंदे हे आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यास बसले. तेव्हा आयुक्तांनी शिंदे यांना ‘तू गुंड आहेस, मराठी संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात’ असे शब्द वापरले. यामुळे वातावरण आणखी चिघळले.