Raj Thackeray Dasara Melava live updates 2024
Raj Thackeray’s Dasara Melava 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच दसरा मेळावा घेत आहेत. मात्र त्यांचा हा मेळावा हटके आहे. तरुणांना आकर्षित करणारा पॉडकास्ट हे माध्यम राज ठाकरे यांनी वापरले आहे. पॉडकास्टच्या माध्यमांतून पहिल्यांदाच राज ठाकरे हे जनतेसोबत संवाद साधणार आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कोणत्याही क्षणी निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पॉडकास्टमधून राज ठाकरे हे काय भूमिका मांडतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. दसरा मेळाव्यातून राज ठाकरे हे महाराष्ट्रातील जनतेला आणि मराठी माणसांना काय संबोधतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
12 Oct 2024 10:26 AM (IST)
मतदारांना आवाहन करताना राज म्हणाले, गेली पाच वर्ष आणि मागील अनेक वर्ष खासकरुन मागच्या पाच वर्षामध्ये तुमच्या मतांचा अपमान करण्यात आला. ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं. वेड्या वाकड्या युती आणि वेड्या वाकड्या आघाड्या करत बसले. ते आज बोलतील सगळेजण. त्यांच्या संध्याकाळच्या मेळाव्यामध्ये एकमेकांची उणीधुणी काढतील. त्यात तुम्ही कुठे असणार आहात. तुम्ही नसणार आणि महाराष्ट्र नसणारच आहे. मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय. गेली अनेक वर्षे पाहतोय. ही साकारण्याची संधी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मिळू दे. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा हेच माझं स्वप्न आहे. आता शस्त्र उतरवा आणि ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी या सगळ्यां लोकांचा तुम्ही वेध घ्या. एवढचं मी आज दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी दसऱ्याच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यामध्ये विविध स्थापन झालेल्या युतींवर लक्ष साधले. तसेच सर्वांना संधी दिली आता माझे स्वप्नातील महाराष्ट्र साकारण्याची संधी द्यावी अशी विनंती राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे केली आहे.
12 Oct 2024 10:07 AM (IST)
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी दसरा मेळावा घेतला जात आहे. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच पॉडकास्टच्या माध्यमातून दसऱ्याच्या निमित्ताने संवाद साधला. यावेळी मतदारांना आवाहन करत राज ठाकरे म्हणाले की, "निवडणुकांच्या निमित्ताने तुम्हाला ही संधी आलेली आहे. माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे. सर्वांना संधी दिलीत तुम्ही. उद्या मेळावा होणार असून यामध्ये बोलणारच आहे. पण आज दसऱ्याच्या निमित्ताने सांगतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी क्रांती केली पाहिजे. आजपर्यंत तुम्ही जे सर्व लोकांना निवडून देत आलात. त्यांना तुम्ही जोपासलं आणि सांभाळलं. ते तुमच्या मतांची प्रतारणा करत आलेत. तुम्हाला अत्यंत गृहित धरलं गेलं. आणि दरवेळेला हे जे गृहित धरणं आहे हेच महाराष्ट्राराचं नुकसान करत आलं आहे. माझ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकं, शेतकरी, तरुण-तरुणींना माझी हात जोडून विनंती आहे. की या दसऱ्यानंतर येणाऱ्या ज्या निवडणूका आहेत. त्यावेळी बेसावध राहू नका. त्या शमीच्या झाडावरची शस्त्रं आता उतरवा. ही क्रांती आणि वचपा घेण्याची वेळ आहे. आता ही शस्त्र उतरवून या सर्वांचा तुम्हाला वेध घ्यावा लागेल," असे आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना केले.
12 Oct 2024 09:48 AM (IST)
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "यंदाचा दसरा हा महत्त्वाचा आहे. कारण तो निवडणुकींच्या तोंडावरती आहे. अशा वेळी तुम्ही बेसावध राहून चालणार नाही. दरवर्षी तुम्ही बेसावध राहतात आणि हे सर्व राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात. आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे हे जरा सांगा. नुसते रस्ते, फॉयओव्हर आणि पूल बांधणं ही प्रगती नसते. आमच्या हातामध्ये मोबाईल फोन आले, घरात कलर टीव्ही आला या गोष्टी आणि तुमची उपकरणं म्हणजे तुमची प्रगती नव्हे. प्रगती डोक्यातून व्हावी लागते. प्रगती ही समजाची व्हावी लागते. जेव्हा आपण देशाच्या बाहेर जातो आणि इतर परदेशातील देश पाहतो त्याला प्रगती म्हणतात. आपण मात्र अजूनही चाचपडत आहोत. इतक्या वर्षीचा तुम्हाला प्रगतीच्या थापा मारुन देखील तुमचा राग व्यक्त होतच नाही. त्याच त्याच लोकांना आणि त्याच त्याच माणसांना दरवेळी निवडून देता. आणि पश्चातापाचा हात कपाळावर मारत राहायचा. पाच वर्षे बोंब मारायची. तुम्ही ऐन मोक्याच्या वेळेला शस्त्र झाडावर नेऊन ठेवता. जे मतदानाचं शस्त्र तुमच्या हातामध्ये आहे. ते मतदानाच्या दिवशी न वापरता, ह्या सगळ्यांना शिक्षा न करता. तुम्ही मतदानावेळी शस्त्र वर ठेवून देता. आणि निवडणुका संपल्या की मग शस्त्र बाहेर काढता. आणि या सगळ्या लोकांवर बोलत राहतात. पण मतदानाच्या दिवशी काय होतं? हा माझ्या जातीचा..हा माझ्या ओळखीचा..हा माझ्या जवळचा असं करुन राज्य आणि राष्ट्र नाही उभं राहत," असे म्हणत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मतदारांना मोलाचा सल्ला दिला आहे.
12 Oct 2024 09:37 AM (IST)
राज ठाकरे यांनी पॉडकास्टची सुरुवात भाषणाप्रमाणे आपल्या हटके स्टाईलमध्ये केली. माझ्या तमाम हिंदू बंधुंनो...बहिणींनो..आणि मातांनो... म्हणत राज ठाकरे यांनी सर्वांना दसरा सणाच्या शुभेच्छा दिल्या. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे यांनी हिंदू बांधवांना कानपिचक्या दिल्या आहेत. राज ठाकरे म्हणाले, "दसरा म्हटलं की आपण सोनं लुटत आलो आहोत. महाराष्ट्रचं सोनं तर गेली अनेक वर्षे लुटले जात आहे. आणि आम्ही फक्त आपट्यांची पानं एकमेकांना वाटतो आहे. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही. आणि बाकीचे सगळे सोनं लुटून चाललेले आहेत. पण आमचं दुर्लक्ष आहे. आम्ही कधी स्वतःच्या आयुष्यामध्ये मशगुल तर कधी जाती पातीमध्ये मशगुल आहोत. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी," असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
12 Oct 2024 09:28 AM (IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. दसऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच संवाद साधला. याची पॉडकास्टची सुरुवात समर्थ रामदास स्वामी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील श्लोक म्हणून झाली. राज ठाकरे यांच्या आवाजातील समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली स्तुती ऐकून दसरा मेळाव्याला सुरुवात झाली. त्यानंतर राज ठाकरेंच्या पॉडकास्टमध्ये राजमुद्रा दाखवण्यात आली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये रेल्वे इंजिन नाही तर राजमुद्रा याच चिन्हावर मनसे लढणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहे.