मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प दीड दोन महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये गेला, त्यानंतर रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प देखील राज्याबाहेर गेला होता. मागील आठवड्यात टाटा एअरबसचा विमान निर्मितीचा प्रकल्प (Tata Airbus Project) सुद्धा राज्याबाहेर गेला. त्यानंतर राज्यात होणारा सॅफ्रन प्रकल्प (Saffron Project) देखील राज्याबाहेर गेला आहे. त्यामुळं विरोधक आक्रमक झाले असून, विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रातील उद्योग धंदे बाहेरच्या राज्यात पाठवत आहेत. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रद्रोही असल्याची टिका विरोधकांनी केली आहे. याविरोधात संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत असताना, सॅफ्रन प्रकल्प (Saffron Project) राज्याबाहेर गेल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व राज्य सरकारवर टिका आहे.
[read_also content=”पालिकेतील 12 हजार कामांची चौकशी कॅगकडून होणार, आशिष शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/twelve-thousand-jobs-in-the-municipality-will-be-investigated-by-cag-informed-ashish-shelar-340589.html”]
दरम्यान, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत मनसेची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर विचार करायला हवा. पंतप्रधान हे सर्व देशाचे आहेत. देशातील प्रत्येक राज्य त्यांना समान मुलांसारखे असायला पाहिजे, महाराष्ट्रातला प्रकल्प बाहेर आसामला गेला असता, तर मला वाईट नसते वाटले. पण, महाराष्ट्रात येणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातमध्येच कसा जातोय याचे वाईट वाटते. त्यामुळे याकडे पंतप्रधानांनी स्वत:हून लक्ष दिले पाहिजे. असं राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली. मनसेची आज मुंबईतील वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.