मुंबई : सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Lok Sabha Election) सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. पण, महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) अद्यापपर्यंत सुरू आहे. त्यावरच निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
आचारसंहिता कालावधीत एखाद्या अत्यंत तातडीच्या प्रकरणी आचारसंहितेतून सूट देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे, अशी प्रकरणे निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी या कार्यालयाच्या २८ फेब्रुवारी २०२४ च्या परिपत्रकान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने शिफारस केलेले प्रस्ताव या कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतात.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत अशा एकूण ५९ प्रस्तावांवर भारत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. तरी आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचे कटाक्षाने पालन केले जाईल, याची सर्व संबंधितांद्वारे दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित करुन आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे.