MP Medha Kulkarni demands CBI probe into Phaltan Yashwant Bank Fraud
पुणे : फलटण येथील यशवंत बँकेचा 150 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा प्रमुख समावेश असून त्यांनी वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेक लोकांची फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामध्ये अनेक जणांच्या नावावर बोगस कर्ज काढणे, सदरची थकीत कर्ज, सदर कर्जाचे पैसे हस्तेपरहस्ते बोगस कंपन्यांमध्ये वळवलेले असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी यशवंत बँक घोटळ्याची CBI चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा फायदा केला आहे. त्याचप्रमाणे बँकेमधील पैशांचा विनीयोग स्वतःच्या खाजगी मालमत्ता घेण्यासाठी केला असल्याने त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी फसवणूक झालेले बँकेचे ठेवीदार व कर्जदार यांच्यासह निलेश जाधव, गणेश पवार, एस डी कुलकर्णी उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाल्या, “यशवंत सहकार बँकेचे अनेक ठेवीदार यांच्याशी मी बोलणे केले. लोकांनी ज्या ठेवी बँकेत ठेवले होत्या ते मिळणे अशक्य झाले आहे. सदर रक्कम पाच लाखांच्या आत आहे दबाव ठेवीदार यांच्यावर टाकला जात आहे”. माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, “कर्जबुडीत यांच्यासोबत जाऊन मी त्यांची चुकीची बाजू घेत असल्याचा आरोप केला. परंतु बँक अध्यक्ष यांनी स्वतः पदाचा दुरुपयोग करून खोटी कर्ज प्रकरणे करून बँकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याने कर्ज बुडीत झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“127 कोटी रुपये कर्ज ही केवळ शेखर चरेगावकर यांच्या आणि नातेवाईक यांच्या नावाने आहे. स्वतःच्या बँकेतून कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या नावावर कोणते कर्ज नाही सांगणे बिनबुडाचे आहे. ठेवीदार यांचे पैसे बँक देऊ शकत नसल्याने ती बुडीत दाखवून आरबीआयकडून केवळ पाच लाख रुपये ठेवीदार यांना देण्याचे आश्वासन देऊन ग्राहक आणि शासन यांची फसवणूक करण्यात येत आहे. कोणत्याही कागदपत्राची शहानिशा न करता कर्ज वाटप झाल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी मोठा घोटाळा केला असून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी. बँकेवर प्रशासक नेमण्यात यावा. चुकीच्या व्यक्तीच्या नावे कर्ज घेतल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “बँकेच्या 230 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत आलेल्या आहेत. मोठी अनियमितता असून सहकार खात्याने कायदेशीर कारवाई अद्याप केली नाही. सहकार खाते, पोलीस खाते यांनी अद्याप कारवाई का केली नाही हा प्रश्न आहे. माझ्या संपर्कात ज्या व्यक्ती आहे त्यांना शेखर चरेगावकर यांचे भाऊ यांच्याकडून धमकावले जात आहे. तसेच सहकार खात्यातील अधिकारी यांच्यावर देखील दबाव टाकला जात आहे. मला देखील तुम्ही याप्रकरणात गप्प बसा अन्यथा तुमचे मागील वेळी सारखे तिकीट कापू, असा इशारा शेखर चारेगावकर यांचे भाऊ शार्दुल चरेगावकर यांनी नाशिक येथील मध्यस्थ मार्फत दिला आहे,”असा गंभीर आरोप खासदार मेधा कुलकर्णी त्यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केंद्रीय सहकार विभाग यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटून मी तक्रार करणार आहे. जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारण सामान्य नागरिकाचे पैसे यात लुबाडण्यात आले आहे. भाजपमधील पदाच्या आडून कोणी असा गैरकारभार करत असेल तर पक्षातील वरिष्ठ त्याची गंभीर दखल घेतील.
सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा
याप्रकरणी सहकार आयुक्तांना भेटून कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. याची सखोल चौकशी करून सहकार आयुक्तांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा ठेवीदार आणि कर्जदार यांना घेऊन सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला.