पुणे: दहशतवादाच्या विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी, देशातर्फे पाठविल्या जाणाऱ्या एका शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही संधी प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे सुळे यांनी आभार मानले आहेत.
सीमेपलिकडून पाकिस्तान सातत्याने दहशतवादी कारवाया करीत आहे . त्याचा भांडाफोड होऊन मुखवटा फाटणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्यासाठी शक्य ते सर्व काही करण्यास भारत तयार आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आपण सक्षम असल्याचे भारताने वेळोवेळी जगाला दाखवून दिले ही वस्तुस्थिती आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेची प्रतिनिधी म्हणून देशाचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली हा मोठा बहुमान आहे. मतदार संघातील जनतेने आपल्यावर सातत्याने टाकलेला विश्वास, दिलेले अलोट प्रेम आणि सेवेची संधी यामुळेच हे शक्य झाले आहे. याबद्दल आपण सर्वांचे ॠणी आहोत, अशी भावना खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचा होणार पर्दाफाश!
भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या सुरू असलेल्या युद्धात ऑपरेशन सिंदूर हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या संदर्भात, भारतातील सात सदस्यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देणार आहे. या शिष्टमंडळासाठी मोदी सरकारने जाहीर केलेल्या खासदारांच्या नावांमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि तिरुवनंतपुरमचे लोकसभा खासदार शशी थरूर यांचा समावेश आहे.
परदेशात भारताची बाजू मांडण्यासाठी मोदी सरकारने सात खासदारांचे एक शिष्टमंडळ तयार केले आहे. शशी थरूर यांच्याशिवाय भाजपचे रविशंकर प्रसाद, जेडीयूचे खासदार संजय झा, भाजपचे खासदार बैजयंत पांडा, द्रमुकच्या खासदार कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावांचा समावेश आहे.
भारताचे हे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेट देईल आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाला पोसण्यासाठी आपले विचार मांडेल. भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देईल. हे सर्व खासदार सांगतील की भारत पाकिस्तानच्या दहशतवादामुळे कसा त्रस्त आहे आणि ऑपरेशन सिंदूर सारख्या कृती करण्यास त्याला भाग पाडले गेले आहे. या कारवाईचा उद्देश केवळ दहशतवाद्यांचा खात्मा करणे आहे.
दरम्यान, हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ अमेरिका, ब्रिटन, युएई, दक्षिण आफ्रिका, जपान आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या इतर सदस्य देशांना भेट देतील. परदेश दौऱ्यादरम्यान, हे शिष्टमंडळ भारत दहशतवादाविरुद्ध कसा लढत आहे आणि संपूर्ण जग दहशतवादाविरुद्ध का एकत्र आहे हे स्पष्ट करेल. केंद्र सरकार पहिल्यांदाच अशा प्रकारे अनेक पक्षांच्या खासदारांना परदेश दौऱ्यावर पाठवत आहे. काश्मीरबाबत भारताची भूमिका स्पष्ट करणे तसेच सीमावर्ती दहशतवाद आणि पाकिस्तानची दहशतवादी भूमिका अधोरेखित करणे हा त्याचा उद्देश आहे.