MPDA action against terrorizing pune criminals
पुणे : भारती विद्यापीठ परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणखी एका अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई केली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. पोलीस आयुक्तांची ही ६९ वी स्थानबद्धतेची कारवाई आहे. सागर संदिप शर्मा उर्फ भोवते (वय २०, रा. लेक टाऊन जवळ, भारती विद्यापीठ) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.
मागील ५ वर्षांत त्याच्यावर ७ गंभीर गुन्हे दाखल
सागर शर्मा उर्फ भोवते हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह लोखंडी कोयता, तलवार यासारख्या हत्यारांसह जबरी चोरी, पळवून नेणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. गेल्या ५ वर्षात त्याच्यावर ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण
त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताला व मालमत्तेला नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे त्याच्याविरोधात तक्रार देण्यास धजावत नव्हते. सागर शर्मा याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता.
एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश
प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी सागर शर्मा याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि पोलीस अधिकारी यांच्या पथकाने केली.






