पुणे - मुंबई महामार्गावर जखमींना तातडीने उपचार मिळणार! MSRDC ने घेतला 'हा' मोठा निर्णय
पुणे: पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातात वर्षाला सरासरी शंभर हुन अधिक व्यक्तींचा मृत्यू होतो. यात अनेकांना वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे, पण आता अपघात ग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध असणार आहे. ती देखील मोफत.’एमएसआरडीसी’ या मार्गावर चार ठिकाणी हेलिपॅड बांधणार आहे. ते ठिकाण देखील ठरविले असून लवकरच त्याचे काम सुरु होणार आहे.
‘एमएसआरडीसी’ प्रशासन खालापूर, ताजेला, तळेगाव, व खोपोली या ठिकाणी चार ठिकाणी हेलिपॅड बांधणार आहे. येथे काही खासगी कंपनी आपल्या सीएसआर फंडातून उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून हेलिकॉप्टरची सेवा देणार आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध झाल्याने त्यांना गोल्डन अवर मध्ये मदत देणे शकय होणार आहे. यामुळे जखमींचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.
प्रशिक्षित वैद्यकीय पथक
राज्य शासन, खासगी रुग्णालये आणि हवाई सेवा कंपन्यांच्या सहकार्याने ही सेवा सुरु होणार असून, त्यासाठी ठिकठिकाणी हेलीपॅड व लँडिंग झोन निश्चित करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, अपघात घडताच स्थानिक प्रशासन आणि टोल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्वरित हेलिकॉप्टरची मदत घेता येणार आहे. यामध्ये प्रशिक्षित वैद्यकीय पथक, प्राथमिक उपचारासाठी लागणारी अत्यावश्यक साधने व अपघातग्रस्ताला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्याची संपूर्ण व्यवस्था असणार आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक वेळा विलंबामुळे गंभीर जखमींचा मृत्यू होत असल्याचे निरीक्षण असून, ही सेवा त्यावर प्रभावी उपाय ठरणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांची आकडेवारी (२०२३ – मे २०२५ पर्यंत)
वर्ष अपघात मृत्यू जखमी
२०२३ २८० १५५ ३१०
२०२४ २६० १४० २९०
२०२५ (मे पर्यंत) ९५ ५२ ११०
एकूण ६३५ ३४७ ७१०
-दर महिन्याला सरासरी 20 ते 25 अपघात होतात.
-मृत्यूचं प्रमाण हे बहुतेकदा अतिवेग, सीटबेल्टचा अभाव, व देराने वैद्यकीय मदत मिळणे यामुळे वाढते.
-खोपोली घाट, बोरघाट, व लोणावळा परिसर हे विशेषतः अपघात प्रवण क्षेत्र मानले जातात.
ही आहेत अपघाताचे कारणे :
अतिवेगाने वाहन चालवणे
झोप येऊन होणारे अपघात
अवजड वाहनांच्या चुकीच्या पार्किंगमुळे होणारी अडथळे
वाहन चालवताना मोबाईलचा वापर
गोल्डन अवरचे महत्त्व :
अपघातानंतर पहिल्या १ तासाला “गोल्डन अवर” म्हटले जाते. या वेळेत योग्य वैद्यकीय मदत मिळाली, तर मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. पण एक्सप्रेसवेवरील दूरवर पसरलेल्या अपघातस्थळांवर वेळेवर पोहोचणे हे नेहमी शक्य होत नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर सेवा ही वेळेवर मदतीसाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरत आहे.