Mumbai Metro News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण 174.01 हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो 4, 4A, 10 आणि 11 या मार्गिकांसाठी एक केंद्रीय संचालन व देखभाल केंद्र असून, सीएसएमटी ते मीरा रोड दरम्यान एकूण 55.99 किमीच्या मेट्रोमार्गाला सुरुवात होणार आहे.
सर्व्हे क्रमांक 30 मधील (जुना सर्वे क्रमांक 28) ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या 16 ऑक्टोबर, 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार एमएमआरडीएला “आहे त्या स्थितीत” हस्तांतरित करण्यात आली असून महत्त्वाच्या सार्वजनिक परिवहन पायाभूत सुविधेला प्राधान्य देण्याची राज्य शासनाच्या भूमिका आहे.
या चारही मार्गिकांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांनी तयार केला होता. एकात्मिकता आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी मोघरपाडा येथे एकच संयुक्त डेपो प्रस्तावित करण्यात आला होता.
मोघरपाडा मेट्रो डेपोची धोरणात्मक भूमिका
मोघरपाडा मेट्रो डेपो हे मेट्रो 4, 4A, 10 आणि 11 या मार्गिकांसाठी एक महत्त्वाचे नियंत्रण व देखभाल केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून अखंडित आणि उच्च दर्जाची सेवा सुनिश्चित करण्यात येईल.
असा आहे प्लॅन
• मेट्रो सेवा बंद असलेल्या वेळेत गाड्या उभ्या करणे, जेणेकरून गर्दीच्या वेळेस त्या तत्परतेने वापरता येतील.
• सर्व मेट्रो गाड्यांची मोठी दुरुस्ती (हेव्ही ओव्हरहॉल) व नियमित देखभाल
• उपकरणे काढणे आणि नवीन बसवणे आणि त्यानंतर सुरक्षेसाठी आवश्यक ती पूर्ण चाचणी करणे
• ट्रेन व डेपो प्रणालींचे कामकाज सुरळीत करण्यासाठी ऑपरेशन कंट्रोल सेंटर (ओसीसी) आणि डेपो कंट्रोल सेंटर(डीसीसी) यांच्यामार्फत एकात्मिक नियंत्रण कार्यप्रणाली
या सर्व सुविधांमुळे मुंबई मेट्रो नेटवर्कमध्ये दीर्घकालीन सेवा कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि भविष्यातील विस्तारक्षमता यांचा भक्कम पाया घातला जाईल.
मोघरपाडा मेट्रो डेपोमधील महत्त्वाच्या सुविधा
मोघरपाडा डेपोमध्ये पुढील घटक असतील :
मोठ्या देखभालीसाठी 10 वर्कशॉप ट्रॅक
दैनंदिन आणि नियमित तपासणीसाठी 10निरीक्षण ट्रॅक
रात्री गाड्या उभ्या करण्यासाठी 64 स्टेबलिंग ट्रॅक
चाकांचे प्रोफाइलिंग करण्यासाठी अंडर-फ्लोअर व्हील लेथ
गाड्यांची नियमित स्वच्छता करण्यासाठी ऑटो आणि उच्च क्षमता असलेली वॉश यंत्रणा
अंडरफ्रेम व छतावरील उपकरणांवरील धूळ काढण्यासाठी ब्लो-डाऊन प्लांट
कॅटेनेरी वाहने उभी करण्यासाठी व देखभालीसाठी सीएमव्ही वर्कशॉप
संचालनासाठी डेपो कंट्रोल सेंटर (डीसीसी) आणि प्रशिक्षण कक्ष
आवश्यक डेपो कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधा
निविदा मंजुरी आणि बांधकामाची सद्यस्थिती
निर्धारित निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या २७६व्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानुसार एमएमआरडीएने 905कोटींचे (सर्व करांसह) कंत्राट , SEW–VSE जॉइंट व्हेंचरला दिले आहे.
13 जून, 2025 रोजी ‘नोटिस टू प्रोसिड’ (NTP) जारी करण्यात आली असून, जमीन ठेकेदाराच्या ताब्यात अधिकृतपणे देण्यात आली आहे. डेपोचे बांधकाम तत्काळ सुरू होणार आहे.
शेतकरी केंद्रित पुनर्वसन मॉडेल
सिडकोच्या समतोल विकासाच्या मॉडेलशी सुसंगत अशी भरपाई पद्धत एमएमआरडीएने स्विकारली आहे. या अंतर्गत प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड देण्यात येतात :
* पट्टेधारक शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमीनक्षेत्राच्या 22.5 टक्के भूखंड
* अतिक्रमणधारकांना त्यांच्या मूळ जमीनक्षेत्राच्या 12.5 टक्के भूखंड
मुख्य रस्ते 18 मीटर रुंद आणि अंतर्गत रस्ते 12 मीटर रुंद ठेवून, सर्व भूखंडांमध्ये सुलभ कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणारा एक मुख्य आराखडा तयार करण्यात आला आहे. हे विकसित भूखंड 36 महिन्यांच्या आत प्रदान करण्यात येणार आहेत.
पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, 22 जानेवारी आणि 7 फेब्रुवारी, 2025 रोजी सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक सार्वजनिक सल्लामसलत बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. यात शेतकऱ्यांच्या शंका व अडचणींचे निरसन करण्यात आले. त्यानंतर 198 ऑफर लेटर्स (167 पट्टेधारकांना आणि 31अतिक्रमणधारकांना) वितरित करण्यात आली.
परिवर्तन घडवणारा प्रभाव
मेट्रो 4आणि 4A मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर पुढील सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत :
• सध्याच्या प्रवासाच्या वेळेत तब्बल 50 टक्के पर्यंत घट
• दररोज सुमारे12 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील
• आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या भागांना मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळेल
• वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात लक्षणीय घट
• पूर्व उपनगर आणि ठाणे परिसरात विकासाला चालना
मुंबईच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला बळकटी
मोघरपाडा डेपो ही ‘महत्त्वाची शासकीय प्राथमिकता’ असून, मुंबईच्या एकात्मिक शहरी वाहतूक धोरणातील एक प्रमुख केंद्रबिंदू आहे. या डेपोमुळे खालील उद्दिष्टांचा पाया घातला गेला आहे :
• सुरळीत मल्टिमोडल (बहु-मार्गीय) कनेक्टिव्हिटी
• 55.99 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेची अखंड व विश्वासार्ह सेवा
• शाश्वत पायाभूत सुविधांद्वारे आर्थिक प्रगतीला चालना
सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले,
मोघरपाडा येथील भूखंडाचे एमएमआरडीएने योग्य वेळी केलेले संपादन हे मुंबईच्या मेट्रो नेटवर्कसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरते. मेट्रो 4, 4A, 10 आणि 11या मार्गिकांचा सुसंघटित एकत्रित वापर शक्य करून, या डेपोमुळे कार्यक्षमता, मार्गिकांमधील सुलभ जोडणी आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये मोठी वाढ सुनिश्चित होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे नव्या महाराष्ट्राच्या आकांक्षांना पूरक ठरणारी, शाश्वत व बहुपर्यायी सार्वजनिक वाहतूक पायाभूत व्यवस्था विस्तारण्याच्या उद्दिष्टाला अधिक वेग मिळाला आहे.”
सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे म्हणाले :
“मोघरपाडा येथे उभारला जाणारा एकात्मिक मेट्रो डेपो हा मुंबईच्या मेट्रो यंत्रणेचा कणा बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मेट्रो 4, 4A, 10आणि 11या चार मुख्य मार्गिकांसाठी 56 किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचे अखंड आणि सुसंगत संचालन या माध्यमातून शक्य होईल. हा प्रकल्प केवळ पायाभूत सुविधांचा नाही, तर सर्वसमावेशक विकास, सुलभ प्रवास आणि शाश्वत प्रगती या संदर्भातील आमच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. पारदर्शक जमीन संपादन, शेतकरीकेंद्री पुनर्वसन आणि भविष्यकालीन अभियांत्रिकीचा वापर करून आपण अशा पायाभूत सुविधा उभ्या करत आहोत, ज्यामुळे लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल आणि महाराष्ट्र नव्या युगातील नागरी वाहतूक व्यवस्थेसाठी सक्षम होईल.”
काय म्हणाले MMRDA महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी ?
“मोघरपाडा मेट्रो डेपो ही मुंबईच्या अधिक कनेक्टेड आणि प्रवासीकेंद्री वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाची पायरी आहे. मेट्रो 4, 4A, 10 आणि 11 या चार मुख्य मार्गिकांसाठीच्या या संचालन केंद्रामुळे शहराच्या झपाट्याने विकसित होणाऱ्या मार्गांवर अखंड आणि विश्वासार्ह सेवा सुनिश्चित होईल. स्थानिक शेतकरी समुदायाने दाखवलेला विश्वास आणि सहकार्य यामुळे या टप्प्याचे खरे महत्त्व अधिक ठळक ठरते. संपूर्ण प्रक्रियेत आम्ही पारदर्शकपणे आणि आदराने संवाद साधला आहे. हा डेपो म्हणजे केवळ पायाभूत सुविधा नाही तर सामुदायिक विकास साधण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे असा विश्वास MMRDA महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.