मुंबई : मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) अनेक उपक्रम राबवत असते. आता गणपती बाप्पाला (ganpati) अर्पण केलेल्या निर्माल्यापासून महानगरपालिका खत निर्मिती करणार आहे. लाखो मुंबईकरांचे श्रद्धास्थान असणा-या गणपती बाप्पाला मुंबईकरांनी (mumbaikar) अनंत चतुर्दशीच्या दिवशी भावपूर्ण निरोप दिला. गणरायाच्या चरणी वाहिलेल्या पाने, फुले, दूर्वा इत्यादी निर्माल्याचा वेगळा विचार बृहन्मुंबई महानगरपालिकेने केला असून, जमा झालेल्या तब्बल ५ लाख ४९ हज़ार ५१५ किलो निर्माल्यापासून सेंद्रीय खत (Organic fertilizer) तयार केले जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक निर्माल्य संकलन हे अनुक्रमे भांडुप (एस विभाग), अंधेरी पश्चिम (के पश्चिम) व बोरिवली पश्चिम (आर मध्य) या विभागांमध्ये झाले आहे. या निर्माल्यापासून सेंद्रीय खत करण्याची कार्यवाही महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) डॉ. (श्रीमती) संगिता हसनाळे यांनी दिली आहे.
[read_also content=”टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूना मिळाली संधी https://www.navarashtra.com/sports/indian-team-selected-for-twenty-twenty-world-cup-325171.html”]
दरम्यान, गणपती बाप्पाला यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अर्पण करण्यात आलेले सुमारे ५ लाख ४९ हज़ार ५१५ इतक्या मोठ्या प्रमाणातील निर्माल्य हे महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये असणा-या सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच आता ह्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरूवातही झाली आहे. पुढील साधारपणे एका महिन्याच्या कालावधीत ह्या सर्व निर्माल्याचे रुपांतर सेंद्रीय खतामध्ये होईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यामार्फत देण्यात आली आहे. तर तयार होणारे हे सेंद्रीय खत महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये असलेल्या झाडांना खत म्हणून वापरण्यात येणार आहे.