Mumbai Police registers case against 9 activists of Maratha reservation Mumbai agitation
Maratha Reservation : मुंबई : मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. जरांगे पाटील यांनी मागील पाच दिवस आमरण उपोषण करुन जोरदार मागणी केली. यानंतर राज्य सरकारने जरांगे पाटील यांनी आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे जरांगे पाटील यांनी जीआर निघाल्यानंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आता मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील मराठा आंदोलनामध्ये 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मराठा समाजाकडून मुंबईमध्ये आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आले. हजारो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले होते. यामुळे आझाद मैदानासह विविध परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर अंघोळ केली तर काही आंदोलक हे बॅरिकेट्सवर चढले होते. यानंतर आता मुंबई पोलिसांनी 9 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई पोलिसांकडून सोमवारी (दि.01 सप्टेंबर) रोजी मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे गुन्हे बेकायदेशीर जमाव जमवणे, रस्ता रोको यांसारख्या गुन्हा अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत. काही आंदोलकांनी जबरदस्तीने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया परिसरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परवानगी नसताना आंदोलक प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली.
मुंबई पोलिसांकडून एकूण 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात तीन, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दोन, तर एमआरए मार्ग, जे.जे. मार्ग, डोंगरी आणि कुलाबा येथील पोलीस ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे सर्व गुन्हे सोमवारी नोंदवले असून, यात सहभागी सर्वांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र संबंधित कलमांमध्ये सात वर्षपिक्षा कमी शिक्षा असल्याने अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे अधिका-यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनोज जरांगे पाटील यांच्या अटींमध्ये आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची देखील अट होती. ही अट मान्य करण्यात आली आहे. आता मात्र 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राजकीय गुन्हे हे मागे घेतले जातात. आंदोलकांवर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे अशा तक्रारींचा समावेश आहे.