
मोठी बातमी ! मुंबईत तब्बल 106 बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस; कारणही आलं समोर...
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’ अर्थात ‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ कार्यान्वित करणे, यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे. तर, 1 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ‘रेफरन्स ग्रेड एअर क्वालिटी मॉनिटर’ बसविण्याचे आदेशही यापूर्वीच देण्यात आले आहेत. मात्र, काही बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित आदेशांनुसार अत्यावश्यक असणारी ‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ बसविण्यात आली नसल्याचे आढळून येत असल्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत १०६ बांधकामांना ‘कार्य स्थगिती’ नोटीस देण्यात आल्या आहेत. अशा सर्व प्रकल्पांना काम बंद करण्याच्या नोटीस तातडीने देण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
वायू प्रदूषण प्रकरणी पुढील न्यायालयीन सुनावणी शुक्रवारी (दि.23) रोजी होणार आहे. पूर्वनियोजित कृती आराखड्यानुसार प्रत्यक्ष स्थळभेटी व पाहणी सुरू ठेवण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनाने सर्व विभागस्तरीय पथकांना दिले आहेत. या अंतर्गत प्रत्यक्ष तपासणी, नोंदवही निरीक्षण आणि तात्काळ कारवाईवर भर देण्यात येत आहे. ही कारवाई केवळ बांधकाम क्षेत्रापुरतीच मर्यादित नसून नियमांचे पालन न करणाऱ्या बेकरी युनिट्सवरही ‘कार्य स्थगिती’ नोटीस देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभाग यांना देण्यात आले आहेत. धूर, इंधन वापर आणि उत्सर्जन मानकांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा : BMC Mayor Reservation : मुंबईवर कोण करणार ‘राज’? आरक्षण जाहीर होताच ‘या’ महिला नेत्यांची रंगली चर्चा
मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून नियम पाळणाऱ्यांना सहकार्य, तर नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासनाद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविधस्तरीय उपाययोजनांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होत आहे.
– अविनाश काटे, उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल)
हेदेखील वाचा : Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे : मराठी माणसाच्या हक्कासाठी उभे राहणारे नेतृत्त्व