Indigo Emergency Landing: मुंबई विमानतळावर आज सकाळी एक मोठा विमान अपघात टळला. बँकॉकहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या (IndiGo Airlines) विमानाचा मागचा भाग लँडिंगवेळी रनवेला धडकला, मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे विमानात असलेल्या सुमारे ३०० प्रवाशांचा जीव वाचला. आता या घटनेची गंभीर दखल घेत ‘डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन’ (DGCA) ने चौकशीचे आदेश दिले आहेत.
IndiGo Spokesperson says, “On August 16, 2025, an IndiGo Airbus A321 aircraft tail touched the runway while executing a low-altitude go-around due to unfavourable weather conditions in Mumbai. Thereafter, the aircraft carried out another approach and landed safely. Following the… pic.twitter.com/hw2JWlJAvr
— ANI (@ANI) August 16, 2025
इंडिगो एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून मुंबईला येणारे फ्लाइट क्रमांक 6E 1060 हे विमान आज पहाटे ३:०६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे क्रमांक २७ वर उतरत होते. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे ‘एअरबस ए३२१’ (Airbus A321) विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला. यामुळे विमानात एक जोरदार धक्का बसला आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान सुरक्षितपणे लँड केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
विमान अचानक हेलकावे खाऊ लागल्याने वैमानिकाने तात्काळ ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’ (ATC) शी संपर्क साधून तातडीच्या लँडिंगची परवानगी मागितली. परवानगी मिळताच विमान रनवेवर उतरवण्यात आले. सुरक्षित लँडिंग झाल्याचे पाहताच, तत्काळ फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांची टीम रनवेवर पोहोचली. सर्व प्रवाशांना ‘इमर्जन्सी गेट’द्वारे बाहेर काढून, विमान तपासणीसाठी ‘आयसोलेशन बे’ मध्ये नेण्यात आले.
दरम्यान, मुंबई शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इतर किमान १४ विमानांनादेखील लँडिंग करता आले नाही. त्यामुळे ही विमाने इतर विमानतळांवर वळवण्यात आली. या घटनेनंतर ‘डीजीसीए’ने इंडिगोच्या या विमानाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
याआधी, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, दिल्लीहून बेंगळुरूला उड्डाण करणाऱ्या इंडिगोच्या A321 विमानालाही लँडिंग दरम्यान टेल स्ट्राइकचा सामना करावा लागला होता. चौकशीदरम्यान त्या विमानातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते, असे अहवालात म्हटले आहे.