फोटो सौजन्य- सोशल मीडिया
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून निवडणूक शांतता आणि पारदर्शकतेने पार पडावी यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. मुंबई जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई जिल्ह्यात 25 लाख 43 हजार 610 मतदार आहेत. त्यापैकी 11.77 लाख महिला, 13.65 लाख पुरुष, 244 तृतीयपंथी, 53,991 ज्येष्ठ नागरिक (85 वर्षांवरील) आणि 39,496 नवमतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी 2,538 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, जवळपास 12,500 निवडणूक कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रावर स्वच्छतागृह, रांगेसाठी प्रतिक्षालय, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आणि सहाय्यक कर्मचारी अशा सर्व मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. सक्षम अॅपद्वारे नोंदणीकृत मतदारांना त्यांच्या गरजेनुसार सेवा पुरवली जाईल.
विधानसभा मतदार संघनिहाय मतदार संख्या
धारावी – २६१८६९
सायन-कोळीवाडा – २८३२७१
वडाळा – २०५३८७
माहिम – २२५९५१
वरळी – २६४५२०
शिवडी – २७५३८४
भायखळा – २५८८५६
मलबार हिल – २६११६२
मुंबादेवी – २४१९५९
कुलाबा – २६५२५१
मतदानासाठी 3,041 बॅलेट युनिट्स, 3,041 कंट्रोल युनिट्स आणि 3,294 VVPAT यंत्रे तैनात करण्यात आली आहेत. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे.
मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदान प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मतदारांनी आपल्या नावाची खातरजमा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर अथवा क्यूआर कोड स्कॅन करून करावी.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सुविधा
मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक (८५+) मतदारांसाठी मतदानाच्या दिवशी विशेष सोयी-सुविधा दिल्या आहेत. सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या मतदारांसाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर आणि सहाय्यक उपलब्ध आहेत. नोंदणी न केलेल्यांची घरी जाऊन मागणी नोंदवली जाते. मोफत वाहन व्यवस्था आणि प्रत्येक मतदारसंघासाठी रूट प्लान तयार करण्यात आला आहे.
मतदानकेंद्रावर मोबाईल नेण्यास मनाई
२० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास मनाई आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात येईल. मोबाइलचा गैरवापर टाळण्यासाठी मतदान केंद्रांवर त्याचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे.
लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि निवडणुकीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई जिल्हा प्रशासनाने नियोजनबद्ध आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची खात्री केली असून, सर्व मतदारांनी शांततेत मतदान करावे , असे प्रशासनाने सांगितले आहे.