फोटो सौजन्य- सोशल मीडिया
शिवडी विधानसभा मतदारसंघातून सोमवारी (दि.२८) रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेना गटनेते अजय चौधरी यांनी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. निष्ठेवर उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करत शिवडी, परळ, लालबागचा विकास करणार असल्याची प्रतिक्रीया अजय चौधरी यांनी दिली.
अजय चौधरी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरताना निघालेल्या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. निष्ठेचा विजय होणार, शिवडीत मशाल धगधगणार अशा जोरदार घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता विधानसभा निवडणुकीची मुंबईत जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मुंबईतील प्रत्येक जागेवर उद्धव ठाकरे यांनी तोलून मोपून आपले शिलेदार उभे केले आहेत.
शिवडी विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला
शिवडी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघात योग्य उमेदवाराची निवड ठाकरे यांना महत्त्वाची वाटत होती. शिवसेना फुटल्यानंतर अजय चौधरी ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. त्यामुळे विधानसभेला तिकीट देऊन ठाकरेंनी चौधरी यांच्या एकनिष्ठतेची पोचपावती दिल्याचे मानले जात आहे. शिवडी मतदार संघातील लालबाग, परळ येथे शिवसेनेची मोठी ताकद आहे. आता पक्षफुटीनंतर ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या अजय चौधरी यांना पुन्हा संधी मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत होते.शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मागे शिवडीतील शिवसैनिक एकनिष्ठपणे उभा- अजय चौधरी
शिवडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजय चौधरी प्रतिक्रीया देताना म्हणाले, शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे संपूर्ण शिवडी मतदारसंघातील शिवसैनिक एकनिष्ठपणे उभा आहे. ही लढाई निष्ठेची असून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या सन्मानाची आहे. सामान्य शिवसैनिक, शिवडी मतदारसंघातील मतदार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
शिवडी विधानसभा निवडणूक
गिरणगावामध्ये वाढलेल्या शिवसेनेसाठी शिवडी मतदासंघ हा अत्यंत महत्वाचा आहे. मतदारसंघ पुर्नरचनेनंतर 2009 साली झालेल्या पहिल्या निवडणूकीमध्ये शिवसेनेला मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2014 मध्ये हा मतदारसंघात अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकर यांचा पराभव करत शिवसेनेनेला पुन्हा विजय मिळवून दिला. त्यानंतर 2019 मधील निवडणूकीत अजय चौधरी यांनी जवळजवळ 40 हजार मताधिक्क्यांनी मनसेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघातून अजय चौधरी यांच्यापुढे मनसेच्या बाळा नांदगावकर यांचे आव्हान आहे. येथे महायुतीकडून कोणताही उमेदवार दिला गेला नाही आहे.