चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांची आर्थिक मदत (फोटो सौजन्य-X)
मुंबईतील चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आग लागल्याची घटना घडली.या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 वर्षे आणि 10 वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे.
सध्या मुंबईत सर्वत्र नवरात्रोत्सवाचे वातावरण आहे. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी संकुलातील इमारतीला आग लागली. अपघातातील सातही मृत एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिद्धार्थ कॉलनी संकुलातील एका इमारतीला आग लागली. पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. बृहन्मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी या घटनेची माहिती देणारा अग्निशमन विभागाला फोन करण्यात आला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवारवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. ही आग लेव्हल 1 प्रकारची असून दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला. दूर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच मुंबई महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू – रेस्क्यू ऑपरेशननंतर इमारतीतील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी पाचही जखमींना मृत घोषित करून पोलिसांना माहिती दिली. पॅरिस गुप्ता या सात वर्षाच्या मुलीचा आणि नरेंद्र गुप्ता या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा आगीत मृत्यू झाला. 39 वर्षीय अनिता गुप्ता आणि 30 वर्षीय मंजु गुप्ता या दोन महिलांसह 30 वर्षीय प्रेम गुप्ताचा आगीत मृत्यू झाला.