
हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील 'हा' खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
दरम्यान शुक्रवार २ जानेवारी ते मंगळवार (६ जानेवारी) या पाच दिवसांच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा तसेच धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे (पश्चिम) जिल्ह्यांमध्ये सध्याच्या तुलनेत पहाटेचे किमान तापमान काहीसे वाढण्याची शक्यता आहे. या भागांत किमान तापमान १० ते १३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी जाणवेल. ही स्थिती त्यानंतरही एक-दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असून, गुरुवार ८ जानेवारी पर्यंत थंडीचे प्रमाण तुलनेने कमीच राहू शकते दरम्यान, विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली (उत्तर) तसेच नाशिक (पूर्व) जिल्ह्यांत किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
नंदुरबार, नाशिक, पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १२ ते १६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून, थंडीचा प्रभाव मध्यम स्वरूपाचा राहील. मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात मात्र पहाटेचे किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याने येथे थंडी फारशी जाणवणार नाही. मात्र, शुक्रवार दि. ९ जानेवारीपासून उत्तर भारतातील या प्रणालीचा प्रभाव कमी होऊन थंड, कोरडे पूर्वीय वारे पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या कालावधीनंतर राज्यात पुन्हा थंडी वाढू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान सक्रिय असणारा ईशान्य (हिवाळी) मान्सून यंदा अपेक्षेप्रमाणे बळकट न झाल्याने त्याची तीव्रता सध्या कमी होत आहे. लवकरच ईशान्य मान्सून देशातून निर्गमनाच्या तयारीत असल्याचे संकेत असून, याचा परिणाम जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील महाराष्ट्रातील पुढील थंडीला अनुकूल ठरू शकतो, असेही खुळे यांनी नमूद केले.
‘उत्तर भारतात सध्या सक्रिय असलेल्या कमकुवत प्रत्यावर्ती चक्रीय वारा प्रणालीमुळे महाराष्ट्राकडे थंडी घेऊन येणारे थंड, कोरडे पूर्वीय वारे सध्या पूर्णतः ठप्प झाले आहेत. परिणामी, नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्यात थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्र अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली.
किमान तापमान :
कोकण व गोवा:
अलीबाग – २१.६°से
डहाणू – १९.१°से
गोवा (पणजी) – २०.४°से
हरनाई – २०.८°से
मुंबई (कुलाबा) – २०.६°से
मुंबई (सांताक्रूझ) – १९.४°से
रत्नागिरी – १८.७°से
मध्य महाराष्ट्र:
अहिल्यानगर – १२.३°से
जळगाव – ९.२°से
जेऊर – ११.५°से
कोल्हापूर – १७.१°से
महाबळेश्वर – १३.५°से
नाशिक – १२.६°से
पुणे – १३.५°से
सांगली – १६.४°से
सातारा – १४.०°से
सोलापूर – १८.२°से
मराठवाडा:
छत्रपती संभाजीनगर – १३.८°से
नांदेड – १४.९°से
धाराशिव – १२.४°से
परभणी – १४.०°से
विदर्भ:
अकोला – १५.१°से
अमरावती – १४.५°से
ब्रह्मपुरी – १३.९°से
बुलढाणा – १५.६°से
चंद्रपूर – १५.८°से
नागपूर – १२.७°से
वर्धा – १४.०°से
यवतमाळ – १४.४°से