
फायनान्स कंपन्यांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा दणका; 'कर्जासाठी तगादा लावाल, तर खडी फोडायला जाल'
मुंबई : शेतकऱ्यांवर जबरदस्ती करून त्यांचा छळ करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या, खासगी सावकार आणि बँकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांना त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्यास संबंधितांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात केली जाईल. तुरुंगात त्यांना दगड फोडायला लावू, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल दुर्गम हरसूल येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित दिवाळी शिधावाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपमहापौर विलास शिंदे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या १० हजार विशेष दिवाळी शिधा किटचे आदिवासी आणि शेतकरी कुटुंबांना वाटप करण्यात आले. नांदेडमधील शेतकऱ्याच्या मृत्यूचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, की एका शेतकऱ्याला फायनान्स कंपनीच्या कार्यालयात नेऊन मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. बँका, विमा कंपन्या, खासगी सावकार आणि मायक्रो फायनान्स संस्थांनी शेतकऱ्यांवर दबाव आणून त्यांचा छळ करू नये. जबरदस्तीच्या कर्जवसुलीवर सरकारने बंदी घातली आहे. तरीही शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दबाव टाकणे किंवा त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचे प्रकार घडल्यास शेतकरी आणि शिवसैनिकांनी संबंधितांना थेट पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
मुख्यमंत्री असताना सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही आणि राज्य सरकारचे सहा हजार रुपये, असे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपयांची सन्माननिधीही नियमित मिळत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
१२ सवलतींसह पाच हजारांची मदत
राज्यातील ३०५ तालुक्यांना भीषण दुष्काळाचा फटका बसला आहे. शेतातील उभी पिके वाळली आहेत, मंत्रिमंडळाने प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळग्रस्त शेतक-यांना सरकारकडून मिळणाऱ्या सर्व १२ सवलती दिल्या जातील. तसेच तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त भागांत किसान सहायता केंद्रे
दुष्काळग्रस्त भागांत तातडीने ‘किसान सहायता केंद्रे’ सुरू करण्याचे निर्देश मंत्री दादाजी भुसे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहेत. या केंद्रांमार्फत पीक नुकसानीचे सर्वेक्षण, सरकारी मदतीचे वितरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. दुष्काळामुळे गरीब कुटुंबांना मुलींचे विवाह करणे कठीण होत असल्याने अशा कुटुंबांची यादी तयार करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.
FAQ
प्र. 1: शेतकऱ्यांना त्रास दिल्यास काय कारवाई होऊ शकते?
उ. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात संबंधितांवर गंभीर फौजदारी कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
प्र. 2: एकनाथ शिंदे यांनी कोणाला इशारा दिला?
उ. मायक्रो फायनान्स कंपन्या, खासगी सावकार आणि बँकांना त्यांनी इशारा दिला.
प्र. 3: फायनान्स कंपन्यांविरुद्ध कारवाई का करण्यात येणार आहे?
उ. कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करणे, त्यांचा छळ करणे आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी कारवाईचा इशारा देण्यात आला.