District Level Powerlifting Championship
प्रतिनिधी – स्वप्नील शिंदे – मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि रायगड मिलिटरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२६ यशस्वीरित्या पार पडली. ही स्पर्धा प्रभाकर कुंटे सभागृह, रायगड मिलिटरी स्कूल, न्यू लिंक रोड, ओशिवरा, जोगेश्वरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील मुले व मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. विविध वजनगटांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपली ताकद, शिस्त आणि क्रीडावृत्ती दाखवून दिली. शालेय स्तरावर पॉवर लिफ्टिंगसारख्या ताकदीच्या खेळांना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये फिटनेसची आवड निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग ट्रस्टी राजीव घरत यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन केले. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, कबड्डी, धावणे, बॅडमिंटन, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती, बॉक्सिंग, टेनिस, टेबल टेनिस, सायकलिंग, स्केटिंग आणि बुद्धिबळ यांसारखे सांघिक व वैयक्तिक खेळ आत्मविश्वास, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.सध्याच्या काळात युवा पिढी मोबाईल व ऑनलाइन गेम्समध्ये अधिक गुंतलेली आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे सांगून भविष्यातील पिढीने मैदानी खेळांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शाळेच्या वतीने खेळासाठी आवश्यक मैदान, साहित्य, सुविधा तसेच समन्वय व सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाला सरचिटणीस अजय पाटणकर, मुख्याध्यापिका आरती झा, रचना घरत, मुंबई उपनगरचे क्रीडा कार्यकारी अधिकारी प्रीती टेमघरे, अभिजीत गुरव, सेक्रेटरी रक्षा मारव, शिक्षकवर्ग, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धकांचा उत्साह अधिक वाढला.या स्पर्धेमुळे शालेय स्तरावर क्रीडासंस्कृतीला चालना मिळाली असून, विद्यार्थ्यांना आरोग्यदायी, सक्रिय आणि शिस्तबद्ध जीवनाकडे वळवण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.