Jain community Protest in Mumbai Jain community outrage spills on to streets after Mumbai temple demolition
मुंबई: न्यायालयातली सुनावणी होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेने जैन समाजाचे विर्लेपार्ले येथील मंदिरावर तोडक कारवाई केली. यामुळे जैन समाजात तीव्र संताप उसळला आहे. लाखो जैन समाजबांधव रस्त्यावर उतरले आहेत. विलेपार्ले पूर्व येथील नेमिनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील ३० वर्षे जुने जैन चैतालय या मंदिरावर महापालिका प्रशासनाने बुलडोझर चालवला होता. यामुळे जैन धर्मीय व्यथित झाले आहेत.
जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ शनिवारी (19 एप्रिल) समुदायाकडून मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईतील संपूर्ण जैन आणि हिंदू समाज हिंदू विश्व परिषदेचे सदस्य, जैन समाजाचे सर्व विश्वस्त, मंडळे, संस्था सहभागी झाल्या होत्या. विलेपार्ले पश्चिम रेल्वे स्थानकापासून शांततेत हा मोर्चा निघाला.
महापालिकेने चैतालय मंदिर पाडण्याच्या संदर्भात नोटीस दिली होती. या विरोधात येथील जैन बांधवांनी शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. सूत्रांनुसार, या याचिकेवर १७ एप्रिल रोजी सुनावणी होणार होती. त्यामुळे मंदिरावर कारवाई करू नका, अशी विनंती लोकांनी केली होती. मात्र, सुनावणी होण्यापूर्वीच १६ एप्रिलला कारवाई करण्यात आली. मंदिर पाडण्यास परवानगी देण्यास न्यायालयाने तोंडी स्थगिती दिल्याचे जैन धर्मियांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर के-ईस्ट विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिली. मात्र, जैन समाजाच्या संतप्त भावना अद्याप शमलेल्या नाहीत.
या आंदोलनात भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग आळवणी, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक राजकीय नेते सहभागी झाले. सर्वच नेत्यांनी महापालिकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत याला “बुलडोझर सरकार”ची मनमानी कारवाई म्हटले.