खासदार संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्यावर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये भाष्य करताना, “महाराष्ट्राच्या हितासाठी कौटुंबिक भांडणं विसरायला हरकत नाही,” असे सूचक वक्तव्य केले होते. या विधानानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, “महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणासोबतही एकत्र काम करण्यास तयार आहोत,” असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.
संजय राऊत म्हणाले, काहींना समविचारी लोक एकत्र आलेले नको असतात. राज ठाकरेंनी विषय मांडला तो महाराष्ट्राच्या हिताचा होता. त्यानंतर काही क्षणातच उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. यात अटी शर्थी आल्या का, नाही आल्या, जर गदोन प्रमुख नेते आहेत. जे भाऊदेखील आहेत. ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र येत असतील, आणि त्यांच्यात काही विषय़ांवर सहमती होत आहे. तर त्यात फार वादविवाद करणे योग्य नाही. यात एकही अट शर्त नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही महाराष्ट्र हितासाठी बोलत आहेत. प्रश्न इतकाच आहे. या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्याचा. पण याच महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांचे लोक एकत्र बसत नाहीत.ही लोकभावना आहे. पण याला जर कोणी अटीशर्ती म्हणत असतील त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जीजानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत. माझ्यासारखा माणूस, ज्याने अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत काम केलेला माणूस आहे. आता मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसोबत काम करत आहे, महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय्य आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान, ज्या उच्च ध्येय्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ते ध्येय्य होतं महाराष्ट्र आणि मराठी माणूस, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं ही त्यांची भूमिका होती.आता जर सगळे वाद आणि मतभेद विसरून सगळे एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करत आहोत. कोणतीही अट आणि शर्त उद्धव ठाकरेंनी मध्ये टाकलेली नाही. महाराष्ट्र हितालाच प्राधान्य दिले आहे. जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत, त्यांच्या पंगतीलाही बसू नका, यात कोणती अट आणि शर्त आहे, असा उलट प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
राज ठाकरे जे बोललेत त्यावर उद्धव ठाकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र हितालाच सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. जे याच्या आड येतील, त्याला घरातही घेऊ नका, त्यांच्या पंगतीलाही बसू नका, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र द्रोही कोण आहेत. ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना चांगलंच माहिती आहे. कोणतीतरी शक्ती आहे जी महाराष्ट्र द्रोह्यांच्या पक्षात आहे, जी बाहेर राहून आमच्यात ऑपरेट करत आहे, हे मी ठामपणे सांगत आहे.