
Maharashtra POCSO Cases Rise 9.2% in 2024 ( २०२४ मध्ये महाराष्ट्रात पोक्सो (POCSO) प्रकरणांमध्ये ९.२ टक्क्यांनी वाढ)
या पार्श्वभूमीवर, बाल लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या ‘अर्पण’ या स्वयंसेवी संस्थेने १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान आपल्या देशव्यापी ‘बाल सुरक्षा सप्ताह २०२६’ जनजागृती मोहिमेची घोषणा केली आहे.
बाल लैंगिक शोषण रोखणे आणि अशा घटनांमध्ये पीडित मुलांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुयोग्य हस्तक्षेप आणि आधार देणे हे ‘अर्पण’ संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. संस्था या समस्येवर मूलभूत स्तरावर काम करत असून, मुलांना आणि प्रौढांना वैयक्तिक सुरक्षा शिक्षण देणे, पीडित मुलांचे पुनर्वसन व मानसिक समुपदेशन करणे, तसेच बालसंरक्षण कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन व विविध यंत्रणांसोबत धोरणात्मक पातळीवर सातत्याने कार्यरत आहे. संस्थेने आतापर्यंत देशभरातील लाखो मुले, पालक आणि शिक्षकांना प्रशिक्षित करून बाल सुरक्षेचे एक भक्कम जाळे निर्माण केले आहे.
जनजागृतीचा हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी ‘अर्पण’ दरवर्षी ‘बाल सुरक्षा सप्ताह’ आयोजित करते. यंदाच्या आठव्या पर्वासाठी प्रख्यात अभिनेत्री आणि संस्थेच्या सदिच्छादूत विद्या बालन पुन्हा एकदा जोडल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षी संस्थेच्या #पॉक्सोपकडलेगा मोहिमेने देशभरातील १७.३ कोटी लोकांपर्यंत पोहोचून पॉक्सो कायद्याबद्दलची जागरूकता २०% वरून थेट ४७% पर्यंत वाढवली होती.
याच यशाच्या बळावर यंदा रुकजाओवरनापॉक्सोपकडलेगा ही मोहीम राबवली जात आहे. मुलांकडे अयोग्य नजरेने पाहणे, अनुचित स्पर्श करणे, अश्लील साहित्य दाखवणे किंवा मुलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढणे, डाउनलोड करणे, जवळ ठेवणे आणि पाठवणे हे पॉक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हे असल्याचा सज्जड इशारा या मोहिमेतून संभाव्य गुन्हेगारांना देण्यात येत आहे.
‘अर्पण’च्या कार्याविषयी आणि मोहिमेबाबत बोलताना संस्थेच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापडिया म्हणाल्या, “गप्प राहिल्याने मुलांचे संरक्षण होत नाही; त्यासाठी जागरूकता, वेळीच हस्तक्षेप आणि जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. ‘अर्पण’ संस्थेच्या माध्यमातून आम्ही केवळ कायद्याची माहिती देत नाही, तर बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी समाजाला प्रत्यक्ष कृती करण्यास प्रवृत्त करतो. अनेकांना आपले अनुचित वर्तन कायद्याने शिक्षेस पात्र आहे याची कल्पना नसते. या मोहिमेतून आम्ही स्पष्ट इशारा देतो की, असे गुन्हेगारी वर्तन तात्काळ थांबवा, अन्यथा पॉक्सो कायदा तुम्हाला पकडेल.”
अभियानच्या सदिच्छादूत विद्या बालन म्हणाल्या, “प्रत्येक मुलाला भयमुक्त वातावरणात लहानाचे मोठे होण्याचा आणि सुरक्षित वाटण्याचा हक्क आहे. प्रौढ म्हणून आपण असे वातावरण निर्माण केले पाहिजे, जिथे मुले कोणत्याही भीतीशिवाय मोकळेपणाने बोलू शकतील आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना योग्य मानसिक आधार दिला जाईल. बाल सुरक्षेसाठी ‘अर्पण’ करत असलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यात सहभागी होताना मला अभिमान वाटतो.”
या मोहिमेचा प्रसार करण्यासाठी ‘अर्पण’ने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी भागीदारी केली असून, देशभरातील शाळांमध्ये जनजागृती पोस्टर्स लावली जात आहेत. तसेच, मुंबई महानगर प्रदेशातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील डिजिटल फलक, निवासी सोसायट्यांमधील १,७०० हून अधिक डिजिटल स्क्रीन्स, मुंबई मेट्रोचे मार्ग २ए आणि ७, आणि बेस्ट, टीएमटी व एनएमएमटीच्या १,९०० हून अधिक बसेसवर बाल सुरक्षेचे संदेश झळकणार आहेत. यासोबतच डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून हा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला जात आहे.