
Child Safety Week 2026 Campaign in Mumbai Metro to Raise POCSO Awareness ( मुंबई मेट्रोमध्ये 'बाल सुरक्षा सप्ताह २०२६' मोहीम: POCSO कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न )
यंदाच्या मोहिमेची मध्यवर्ती संकल्पना ‘रुकजाओवरनापॉक्सोपकडलेगा’ ही असून, मुलांविरुद्ध लैंगिक अपराध करणाऱ्यांना यातून स्पष्ट आणि ठाम इशारा देण्यात आला आहे. मुलांसोबत कोणत्याही प्रकारचे लैंगिक अपराध करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असून, संबंधित व्यक्तीला लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियम अर्थात ‘पॉक्सो’ कायद्यानुसार कठोर शिक्षा होऊ शकते.
बाल लैंगिक शोषणामध्ये समाविष्ट होणाऱ्या आणि पॉक्सो कायद्यानुसार दंडनीय असलेल्या कृत्यांची सर्वसामान्यांना सोप्या भाषेत ओळख करून देणे, लोकांना सतर्क करणे आणि अशा घटनांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे प्रमाण वाढवणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या संयुक्त भागीदारीअंतर्गत मुंबई मेट्रोच्या मार्गिका २ए आणि ७ वर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ट्रेनच्या सर्व सहा डब्यांमध्ये ‘रुकजाओवरनापॉक्सोपकडलेगा’ मोहिमेचे पोस्टर्स लावले असून, यातून पॉक्सो कायद्यानुसार दंडनीय असलेल्या सहा कृत्यांची (अयोग्य स्पर्श, अयोग्य नजरेने पाहणे, अश्लील मजकूर दाखवणे, अनुचित फोटो-व्हिडिओ काढणे, मागणे तसेच ते डाउनलोड, सेव्ह किंवा शेअर करणे) माहिती देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन एमएमएमओसीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कान्हुराज बगाटे (आयएएस) आणि अर्पणच्या संस्थापक व सीईओ श्रीमती पूजा तापडिया यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यानंतर मान्यवरांनी गुंदवली ते आरे स्थानकादरम्यान प्रवास करत डब्यांतील पोस्टर्सची पाहणी केली.
याप्रसंगी श्री. कान्हुराज बगाटे म्हणाले की, मुलांच्या सुरक्षेसाठी घर, शाळा आणि सार्वजनिक वाहतुकीत जनजागृती अत्यंत गरजेची आहे. सार्वजनिक वाहनांतून प्रवास करणाऱ्या मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास प्रशासन कटिबद्ध असून, ‘थांबा, नाहीतर कायदा तुम्हाला पकडेल’ असा थेट इशारा या मोहिमेतून गुन्हेगारांना देण्यात आला आहे. प्रत्येक नागरिक पॉक्सो कायदा समजून घेऊन शोषण रोखण्यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या ‘क्राइम इन इंडिया २०२४’ अहवालानुसार, २०२४ मध्ये महाराष्ट्रात पॉक्सो कायद्यांतर्गत ९,४३२ गुन्ह्यांची नोंद झाली असून, २०२३ च्या (८,६३९) तुलनेत यात ९.२% वाढ झाली आहे. एकट्या मुंबईत १,४१६ गुन्हे नोंदवले गेले, ज्यात ६६० गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे होते.
पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार
अभिनेत्री आणि अर्पणच्या सदिच्छादूत विद्या बालन म्हणाल्या की, अनेकदा सामान्य किंवा निरुपद्रवी समजल्या जाणाऱ्या कृती प्रत्यक्षात पॉक्सो कायद्यानुसार शिक्षापात्र गुन्हे असतात. प्रत्येक नागरिकाला हे कायदेशीर परिणाम माहीत असणे गरजेचे असून, जनजागृती हीच जबाबदारीची पहिली पायरी आहे, जेणेकरून कोणताही गुन्हेगार शिक्षेपासून सुटणार नाही.
अर्पणच्या संस्थापक व सीईओ पूजा तापडिया म्हणाल्या की, पॉक्सो कायद्यातील नेमक्या गुन्ह्यांबद्दलची माहिती अजूनही मर्यादित आहे. यंदाच्या मोहिमेतून दंडनीय कृत्ये स्पष्टपणे मांडून ही उणीव भरून काढण्याचा आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. हा संदेश सार्वजनिक ठिकाणी पोहोचवल्याबद्दल त्यांनी विद्या बालन, एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएल यांचे आभार मानत बाल संरक्षण ही सामूहिक जबाबदारी बनवण्याचे आवाहन केले.
‘रुकजाओवरनापॉक्सोपकडलेगा’ मोहिमेद्वारे बाल लैंगिक शोषणाबाबतचे मौन, संकोच आणि अनुचित कृत्यांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती बदलण्याचा अर्पणचा प्रयत्न आहे. पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजाने अशा कृतींचे गांभीर्य ओळखून प्रत्येक बालकासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, असे आवाहन या मोहिमेतून करण्यात आले आहे.