राज्यात काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे. मध्यरात्रीपासूनच पावसाने मुंबई, उपनगर आणि राज्यातील इतर भागात जोरदार बॅटींगला सुरुवात केली आहे. मुबंई आणि उपनगरांना पावसाने अक्षर: झोडपून काढले आहे. अशातच आता बदलापुरमधील उल्हासनदी धोक्याच्य़ा पातळीपर्यंत आली आहे. बदलापुरातील उल्हासनदी चौपाटी पाण्याखाली गेली असल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसाने उल्हास नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यभरात सध्या मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातील वाहतूक देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्याच पावसाने मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने याचा नाहक त्रास सकाळी कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.पुढील सहा तास मुसळधार पावसाचा इशारा असून मुंबईकरांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे.
मुंबई आणि उपनगरातील अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. ठाणे, घाटकोपर, कुर्ला, डोंबिवली, अशा अनेक भागांत रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे. पाऊस सुरु झाला आणि मुंबईच्या लोकल ट्रेनवर परिणाम झाला नाही, असं होणं कठीणच आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे ठाणे ते कल्याण डाऊन आणि अप मार्गावरील लोकलसेवा 10 ते 15 मिनिटांनी उशीराने धावत आहेत. शिवाय कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील लोकलसेवा देखील उशीराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तसंच ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नं 4 वरुन सीएमटीच्या दिशेने सुटणाऱ्या लोकल अनिश्चित काळासाठी थांबण्यात आली आहे.
असाच जर पावसाचा जोर कायम राहिला तर रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. पुढील दोन तासात पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य रेल्वेमार्गावरील अन्य स्थानकांवरही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचू शकते. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने युद्धपातळीवर तयारी केली होती. मात्र, पालिकेचे हे सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरताना दिसत आहेत.
मुंबई, नवी मुंबई शहर, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुण्यामध्ये सकाळपासून पावसाने थोडी उघडीप घेतली आहे. नागरिकांनी सतर्क रहावं असं प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.