
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ चा कायापालट होणार
१९६४ मध्ये सुरू झालेले सध्याचे टर्मिनल १ सुमारे सहा दशकांनंतर कालबाह्य झाले आहे. स्ट्रकवेलने २०१७ मध्ये आणि आयआयटी मुंबईने २०२४ मध्ये केलेल्या स्वतंत्र संरचनात्मक लेखापरीक्षणांमध्ये सुरक्षेशी संबंधित आणि संरचनात्मक त्रुटी अधोरेखित झाल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे जुन्या टर्मिनलच्या जागी आधुनिक सुविधा उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.
नव्या टर्मिनलच्या संकल्पनेत प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रस्थान क्षेत्रात भव्य प्रवेशद्वार, नैसर्गिक प्रकाशाने उजळणारा प्रशस्त चेक-इन हॉल आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या कलाकृती व भित्तिचित्रांचा समावेश असेल. प्रवाशांच्या प्रतीक्षा क्षेत्रात अंतर्गत हिरवळ, प्रीमियम लाउंज आणि धावपट्ट्यांचे दृश्य पाहता येईल अशा मोठ्या काचेच्या दर्शनी भागांची संकल्पना मांडण्यात आली आहे.आगमन क्षेत्रात मुंबईच्या जैवविविधतेचे प्रतीक असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्याचे भव्य शिल्प उभारण्याची कल्पना आहे.
पुनर्विकसित टर्मिनल १ ची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता सध्याच्या १.५ कोटींवरून २ कोटी प्रवाशांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. यामुळे क्षमतेत सुमारे ३३ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांची तपासणी आणि चेक-इन प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी चेक-इन काउंटरची संख्या ७४ वरून १०९ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. सुरक्षा तपासणीची सुविधाही मोठ्या प्रमाणात विस्तारित केली जाणार असून, प्रवाशांसाठी १५ आणि ट्रान्सफर प्रवाशांसाठी पाच असे एकूण २० सुरक्षा तपासणी मार्ग प्रस्तावित आहेत.
विमानापर्यंत पोहोचण्यासाठी रिमोट बोर्डिंगवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने थेट विमानाशी जोडलेल्या कॉन्टॅक्ट स्टँडची संख्या सातवरून २५ पर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पारंपरिक बोर्डिंग गेट्सच्या जागी १२ अत्याधुनिक ई-गेट्स बसविण्यात येणार आहेत. सामान मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बॅगेज रीक्लेम बेल्टची संख्या पाचवरून ११ पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
टर्मिनल १ च्या पुनर्विकासादरम्यान मुंबईतील देशांतर्गत विमानसेवा सुरळीत सुरू राहावी, यासाठी टप्प्याटप्प्याने संक्रमण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जुन्या टर्मिनलचे पाडकाम सुरू झाल्यानंतर देशांतर्गत प्रवासी वाहतुकीचा अतिरिक्त भार हाताळण्यासाठी टर्मिनल २ च्या उत्तर-पश्चिम पिअरचा जी+३ पद्धतीने विस्तार करण्यात येणार आहे. हा विस्तारित भाग मार्च २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.यानंतर जुन्या टर्मिनलच्या जागेवर नवीन टर्मिनल १ उभारण्यात येणार असून, डिसेंबर २०३० पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुनर्विकासामुळे मुंबई विमानतळाची एकूण वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता ६.५ कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
प्रवाशांनो सतर्क राहा! 25 ऑक्टोबरपासून Mumbai Airport वरून 265 उड्डाणे रद्द; नेमकं कारण काय?
Ans: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ चे नवे स्वरूप विकसित करण्यासाठी २०३० पर्यंत टर्मिनल उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
Ans: प्रस्तावित योजनेनुसार, टर्मिनलची प्रवासी हाताळणी क्षमता वार्षिक २ कोटी प्रवाशांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
Ans: टर्मिनलच्या संकल्पित रचनेत फ्लेमिंगो शिल्पासह मुंबईची सांस्कृतिक ओळख आणि शहराची वैशिष्ट्ये दर्शवण्यावर भर देण्यात येणार आहे.