
रोजच म.रे. अशी मध्य रेल्वेची कायमच दाणादाण उडत असते. रोजच कोणत्या ना कोणत्या कारणाने मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने सुरु असते. मात्र आता ऐन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांना घरी जाताना संध्याकाळी पुन्हा एकदा समस्यांना सामोरं जावं लागत आहे. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ठाणे कळवा मार्गावर नाल्यातील कचऱ्य़ाला आग लागल्याची दुर्घटना घडली. आगीमुळे धुराचे लोट पसरले असून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कळवा ठाणे दरम्यान रेल्वे मार्गावर धुराचे लोट पसरल्याने दोन्ही बाजूने 20 ते 30 मिनिटे वाहतूक उशीरा असल्याचं सांगण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार, कळव्याच्या प्लॅटफॉर्म क्र. 2 च्या जवळच परिसरातील कचऱ्याने अचानक पेट घेतला. ही आग गंभीर रुप धारण करण्याआधीच रेल्वे सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवलं.
नेमकं प्रकरण काय ?
कळवा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 2 च्या जवळील परिसरात कचऱ्याने अचानक पेट घेतला. बघता बघता ही आग वाढत जात होती. त्यानंतर रेल्वेच्या सुरक्षा रक्षकांनी ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. असं असलं तरी ही आग कुणी आणि का लावली, याचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहे. घटनास्थळी रेल्वे पोलीसही दाखल झाले. मात्र खबरदारी म्हणून रेल्वे वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. या सगळ्या आगीच्या प्रकरणामुळे मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटांनी उशीराने अपेक्षित आहे.