
थर्टी फर्स्टला रात्रभर परिवहनसेवा, बेस्टच्या २५ जादा बसेस धावणार
नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोची ‘अँववालाईन’ (मेट्रो-३) म्हणजेच आरे ते कफ परेड ही मेट्रो रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही. विशेषतः समुद्रकिनाऱ्यावर नववर्ष साजरी करणाऱ्यांचा प्रवास सुलभ होणार आहे.
मेट्रो-३ ची विशेष सेवा ३१ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजल्यापासून सुरू होईल. ही सेवा १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:५५ वाजेपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे. त्यानंतर, १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५:५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. म्हणजेच, मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे. नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे.
‘हेरीटेज टूर’ या बसमार्गावर बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजल्यापासून गुरुवारी नव वर्षाच्या पहाटेपर्यंत प्रवासी प्रतिसादाच्या उपलब्धतेनुसार चालविण्यात येणार आहे.
थर्टी फर्स्टसाठी तसेच नववर्ष स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई खाडी, मावें चौपाटी इत्यादी समुद्र किनाऱ्यांवर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरीता बेस्ट उपक्रमातर्फे जादा बस चालविण्यात येणार आहे. बुधवारी रात्री २५ जादा बस बेस्टतर्फे चालविण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणाऱ्या प्रवाशांना, पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बुधवारी रात्री १० वाजल्यापासून रात्री साडे बारा वाजेपर्यंत बसमार्ग क्र. सी-८.६, २०३, २३१ तसेच वातानुकूलित बसमार्ग क ए-२१, ९-११२. ९.११६ ए-२४७, ए-२७२. ए-२९४ या बसमार्गावर अतिरिक्त बसफेऱ्या धावणार आहेत. अतिरिक्त बसफेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.