Sanjay Raut,
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून फडणवीस सरकारवर सातत्याने टीका केली जात असते. पण, आता खासदार राऊत यांनी चक्क कौतुक केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सरकारशी किंवा त्यांच्याशी नक्कीच आमचे राजकीय मतभेद आहेत. राजकीय मतभेद असल्यावर एकमेकांवर टीका होते, महाराष्ट्रातील राजकारण टीकेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर आता जहरी टीका व्हायला लागली आहे. तरीही आपण राज्याचे काही देणं लागतो’, असे संजय राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंदुकीचे राज्य मोडून काढतील याची खात्री असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली काम केली तेव्हा त्यांचे कौतुक केलं आहे. गडचिरोलीत विकासाची गंगा वाहत असेल तर त्याचे जर कोणी कौतुक करणार नसेल तर ते चुकीचं आहे. या आधीच्या पालकमंत्र्यांचे काम आम्ही पाहिलं आहे म्हणून मला विकासाचे काम महत्त्वाचे वाटले. या जिल्ह्यातून येणारे खंडण्या गोळा करायचं असे काही लोकांनी ठरवलं होतं, तिकडला उद्योग खंडणी हफ्ते गोळा करण्यासाठीच आहे, असे काही लोकांनी ठरवले होते. त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला नाही, नक्षलवाद हा गरीबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे’.
दरम्यान, नक्षलवाद नष्ट होणार असेल आणि मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललं असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे. त्याचे अभिनंदन आणि कौतुक करणं आपल्या सर्वांचं काम आहे. यात जवळीक साधण्याचा प्रयत्न काय आहे, शिवसेना संस्कार, संस्कृती आणि शिष्टाचार या त्रीसूत्रीवर काम करणारा पक्ष आहे. गडचिरोलीसारखा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो, तिथे नक्षलवादात ज्या प्रकारचे हत्याकांड असेल, पोलिसांचे बळी गेले. सामान्य माणसांचे बळी गेले, हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
जमशेदपूर नंतर गडचिरोली ही पोलाद सिटी बनवणार
गडचिरोली, चंद्रपूर ही सुवर्णभूमी आहे, मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं की ती पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल, जमशेदपूर नंतर गडचिरोली ही पोलाद सिटी बनवणार असतील आणि तिकडच्या बेरोजगारांच्या हाती काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे. फडणवीस यांच्यासमोर दहा खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, त्यांनी संविधान हाती घेतलं याचा प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला कौतुक वाटलं पाहिजे.
आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्री असताना…
तसेच कोणाचाही आवडता जिल्हा नसतो. जमिनीत काय लागतं? काय उगवते? काय पेरणी करून कापायला मिळते? त्याच्यावर आवडता जिल्हा निर्माण होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पोलाद सिटी बनवू इच्छितात, आधीचे मुख्यमंत्री होते त्यांनी मंत्री असताना गडचिरोली यासाठी मागून घेतलं होते की तिथलं पोलाद खाणीचा उद्योग आहे, त्यांच्याकडून ज्या पद्धतीने खंडणी गोळा करण्यासाठी काही पांडव नेमले होते, ते कसे काम करत होते ते महाराष्ट्राने पाहिलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.