
Diwali : रुग्णालयाच्या आवारातही फुलवला दिवाळीचा आनंद; 400 जणांना फराळ, 75 महिलांना साड्या
दिवाळीचा (Diwali) सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि गोडवा घेऊन येतो. मात्र, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेकदा सणाचा आनंद घेता येत नाही. अशा रुग्णांच्या आणि गरजूंच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी सौरभ मित्र मंडळाने पुढाकार घेतला. अन्नमित्र सत्कार्याच्या माध्यमातून मंडळाने टाटा आणि केईएम रुग्णालय परिसरातील 400 हून अधिक रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि गरजूंना एक किलो वजनाचे दिवाळी फराळाचे डबे भेट दिले. तसेच 75 गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
घरातील एखादी व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली की संपूर्ण कुटुंबाचे लक्ष उपचार आणि रुग्णाच्या प्रकृतीकडे लागते. आर्थिक विवंचना आणि उपचारांची चिंता यांमुळे सण-उत्सवाचा आनंदही बाजूला पडतो. टाटा आणि केईएम रुग्णालय परिसरात असे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक दिवाळीपासून दूर असतात. त्यांच्या आयुष्यात थोडासा गोडवा निर्माण व्हावा, या भावनेतून मंडळाने हा उपक्रम राबवला.
या उपक्रमामागे अनेक दात्यांचे आर्थिक सहकार्य, कार्यकर्त्यांची मेहनत आणि सामाजिक बांधिलकीची भावना होती. अन्नमित्र संजय सोमनाथ शेटये यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी १५० फराळाच्या डब्यांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाने यंदा ४०० हून अधिक जणांपर्यंत मजल मारली आहे. दात्यांची वाढती संख्या आणि सहकाऱ्यांचे प्रोत्साहन यामुळे मंडळाच्या या सामाजिक कार्याचा विस्तार होत आहे.
या उपक्रमासाठी सान्वी पेडणेकर, आशालता खानोलकर, नुपूर खानोलकर, प्रल्हाद गवरे, उज्वला गवरे, अशोक गोरीवले, सुलभा गोरीवले, विपुल छेडा, संजय मीना, सुनिता कोटियन, प्रसाद कोरगावकर, जोत्स्ना गुप्ते, दिलीप कदम, मनमोहन निंबाळकर, सत्तार शेख आणि कल्पना वारिया यांनी फराळ भेटीसाठी आर्थिक मदत केली.
दानाची रक्कम किती मोठी आहे, यापेक्षा त्यामागची भावना महत्त्वाची असते. आपल्या आनंदात गरजूंनाही सहभागी करून घेण्याच्या या उपक्रमात अधिक संवेदनशील दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सौरभ मित्र मंडळाचे सरचिटणीस मंगेश वरवडेकर यांनी केले. आपल्या आनंदाचा थोडासा गोडवा दुसऱ्याच्या आयुष्यात उतरवला, तरच दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
Ans: मंडळाने टाटा आणि केईएम रुग्णालय परिसरातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि गरजूंना दिवाळी फराळाचे डबे भेट दिले.
Ans: 400 हून अधिक जणांना एक किलो वजनाचे फराळाचे डबे देण्यात आले.
Ans: पाच वर्षांपूर्वी150 फराळाच्या भेटींपासून या उपक्रमाची सुरुवात झाली होती. यंदा 400 हून अधिक जणांपर्यंत हा उपक्रम पोहोचला.