
मतदार यादीवर अदृश्य हात कोणाचा? हेराफेरी केल्याचे आरोप
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग निहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरू आहे. या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ घालण्यात आला आहे, महापालिका प्रशासन जी यादी तयार करण्याचे काम करत आहे त्या यादीमागे काही अदृश्य हाताने हेराफेरी केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. त्यामुळे हे अदृश्य हात नेमके कोणत्या पक्षाचे आहेत याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
मतदार यादीमध्ये घोळ असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सत्ताधारी पक्षाकडून शेजारील प्रभागातील अनुकूल मते आपल्या प्रभागात ओढण्यात आल्याची आणि प्रतिकूल मते दुसऱ्या प्रभागात ढकलण्यात आल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्तांपर्यंत आल्या आहेत. त्या पार्श्वभूमी वरती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मतदार याद्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत.
पालिकेची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे यानंतर हरकती आणि शहानिशा केल्या जाणार आहेत. हरकती शहानिशा नंतर अंतिम मतदार यादी तयार केली जाणार आहे मात्र त्या अगोदरच मतदार यादीमध्ये प्रचंड गोंधळ असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. यादी तयार करण्यासाठी घालून दिलेले नियम मोडून मनमानी पद्धतीने यादी तयार केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. यादीमध्ये बाहेरील राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय वाढत चालला आहे.
राज्य निवडून आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग निहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरू आहे. महापालिकेची सुमारे 36 लाख मतदार संख्या 41 प्रभागांनुसार विभागातून मतदार यादीचे काम सुरू आहे यासाठी दोन उपायुक्त यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
मतदार यादी विभाजनात हस्तक्षेप
मतदार यादी विभाजन प्रक्रिया राजकीय हस्तक्षेप झाल्याचे तक्रारी येत आहेत. सत्ताधारी पक्षातील काही इच्छुकांनी अनुकूल असलेले शेजारच्या प्रभागातील मतदार आपल्या प्रभागात तर प्रतिकूल मतदारांची नावे इतर प्रभागात ढकलण्याचा आरोप करण्यात येत आहे.
मतदार यादी पडताळणीचा निर्णय
आयुक्तांकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मतदार यादी विभाजनाच्या कामाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पदाधिकाऱ्यांत नाराजी
सत्ताधाऱ्यांना अनुकूल अशी मतदार यादी बनवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांत नाराजी पसरली आहे.
आयुक्तांनी घेतली दखल
मतदार यादी तयार करण्यासाठी आयुक्तांनी दोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे. मतदार यादीतील घोळाला आयुक्तांनी अप्रत्यक्षरीत्या सहमती दर्शवली असली तरी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याचा संदेश दिला आहे.