पतंग उडवणं जीवावर बेतलं ! छतावरून तोल जाऊन पडल्याने एकाचा मृत्यू
नागपूर : छतावर पतंग उडवताना तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. कृष्णा जगतनील बयरीकर (वय 36, रा. जोशीवाडी, रामेश्वरी रोड) असे मृताचे नाव आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेदेखील वाचा : DBT scheme : मंत्री धनंजय मुंडेंचा आणखी एक घोटाळा समोर? हायकोर्टाने विचारला राज्य सरकारला जाब
मंगळवारी संपूर्ण शहरात मकर संक्रांतीचा उत्साह पहायला मिळाला. तरुणांनी आकाशात पतंग उडवून हा उत्साह साजरा केला. मात्र, पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर झाल्याने अनेकजण जखमी झाल्याच्याही घटना पुढे आल्या. पतंगबाजीचा नाद दोघांचा जीवही घेऊन गेला. छतावर पतंग उडवताना तोल जाऊन पडल्याने गिट्टीखदान ठाण्यांतर्गत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली होती. तशीच एक घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गतही पुढे आली आहे.
जोशीवाडीच्या सुलभ शौचालयालगतच बयरीकर कुटुंबाचे दुमजली घर आहे. मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास कृष्णा हे मित्र व कुटुंबीयांसह घराच्या छतावर पतंग उडवित होते. छताच्या काठावर पोहोचल्याचेही त्यांना भान राहिले नाही. या दरम्यान तोल गेल्याने ते थेट छतावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कृष्णा हे खूपच प्रेमळ व्यक्ती होते. त्याच्या मृत्यूने समाज बांधवांसोबतच संपूर्ण परिसरात शोक पसरला आहे. बुधवारी उत्तरीय तपासणीनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत मोठ्या संख्येत लोकांची उपस्थिती होती.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis On Saif Ali Khan: सैफ अली खान हल्ला प्रकरण; CM फडणवीस म्हणाले, “मुंबईत राहणे…”