
आता OYO हॉटेलमध्ये जात असाल तर सावधान! हॉटेल्सवर पोलिसांची करडी नजर; बावनकुळेंनी दिले संकेत
OYO Room Booking : गेल्या काही वर्षांत ऑनलाइन हॉटेल आणि रूम बुकिंगसाठी OYOचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, आता याच OYO हॉटेल्सच्या कारभारावर पोलिसांची नजर आणखी कडक होण्याची शक्यता आहे. नागपुरात यासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. OYO हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची माहिती आणि संबंधित रेकॉर्ड ठेवण्याची व्यवस्था करण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच तब्बल 90 दिवसांचे CCTV चित्रीकरण जतन करणे बंधनकारक असणार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
नागपुरात अनेक हॉटेल्सवर OYOचा बोर्ड दिसतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी OYOचा बोर्ड का लावण्यात आला आहे, त्या हॉटेलमध्ये नेमकी कोणती व्यवस्था आहे, याचीही तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात OYO हॉटेल्सच्या व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
Nagpur News : कागदी आदेश झुगारला; प्रत्यक्ष जप्ती करा, हायकोर्टाचा दणका
बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या या पुढाकाराचं कौतुक केलं. नागपूरची सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा अबाधित राहावी, तसेच कोणत्याही गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी ही नियमावली महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, नागपुरात लागू होणारी ही नियमावली पुढे संपूर्ण महाराष्ट्रातील OYO रूम बुकिंग सेवेसाठी लागू केली जाणार का, याकडे आता लक्ष लागलं आहे. सरकारने तसा निर्णय घेतल्यास राज्यातील OYO हॉटेल्सच्या बुकिंग आणि व्यवस्थापनाच्या पद्धतीत मोठे बदल होऊ शकतात.
दुसरीकडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनावरही भाष्य केलं. जरांगे यांच्या भूमिकेपेक्षा सध्या राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अधिक महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबईतील आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी आंदोलकांनी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी टीका महाराष्ट्रातील जनतेला मान्य नसल्याचंही बावनकुळे म्हणाले.