
Nanded Government Rest House Yeldari Rest House Status Closed Nanded News
Yeldari Rest House : जिंतूर : अतूल जगताप : मराठवाड्यातील सर्वात प्रथम ६५ वर्षापूवी येलदरी या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या वतीने विश्रामगृहाचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु मागील दहा वर्षापासून हे विश्रामगृह बंद अवस्थेत असून आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. विश्रामगृहाचे हाल झाले असून पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येलदरी येथील नावाजलेले विश्रामगृह भूतबंगला बनले आहे. त्यामुळे सध्या येथे अवैध धंदे वाले असून हे विश्रामगृह आहे की दारूचा अड्डा ? हाच प्रश्न उपस्थित होत आहे.
स्वातंत्र भारतात मराठवाड्यात पहिल्यांदाच येलदरी येथे धरणाचे बांधकाम सुरू झाले होते. त्यामुळे सहाजिकच त्या काळात येलदरी येथे विदेशातून अनेक अभियंते आणि भारतातील नावाजलेले अभियंते येथील धरणाच्या बांधकामासाठी येत होते. या अधिकारी आणि अभियंत्यांना राहण्यासाठी सुसज्ज असे विश्रामगृह 65 वर्षांपूर्वी येलदरी येथे बांधण्यात आले होते. या विश्रामगृहात तत्कालीन अनेक मुख्यमंत्री व विविध खात्याचे मंत्री मुक्काम करून गेलेले आहेत. विशेष म्हणजे गोड्या पाण्याची माशी केवळ येथील विश्रामगृहातच मिळत होती.
विश्रामगृहात एकही कर्मचारी शिल्लक राहिला नाही
त्यामुळे संपूर्ण राज्यातून शेकडो अधिकारी येलदरी येथील विश्रामगृहात गोड्या पाण्यातील माशांचा आस्वाद घेण्यासाठी येत असत. मात्र जशी अवकळा पाटबंधारे विभागाला लागली तद्वतच येलदरी येथील विश्रामगृहाची देखील अत्यंत दुरावस्था झाली. मागील १० वर्षांपासून येथील विश्रामगृह बंद अवस्थेत आहे. पाटबंधारे विभागात कर्मचाऱ्यांचीच अत्यंत कमी संख्या असल्यामुळे येथील विश्रामगृहाकडे देखरेखीसाठी एकही कर्मचारी शिल्लक राहिला नाही. त्यामुळे येथील विश्रामगृह भूत बंगला होऊन बसले आहेत, लाखो रुपयांचे वार्षिक उत्पन्न विश्रामगृह रिकाम असल्यामुळे बंद झाले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तब्बल तीन ते चार एकर परिसरामध्ये येथील विश्रामगृह बसलेले असून भोवताली अत्यंत सुंदर असा बगीचा देखील या ठिकाणी होता. मात्र हे सर्व आता इतिहासजमा झाले असून येथील बगीचाची पूर्णतः राख रांगोळी झाली आहे. येथील शेकडो झाडे वाळून गेली आणि विश्रामगृहाची इमारत देखील खंडहर होऊन बसली आहे. या इमारतीचा उपयोग आता अवैध धंद्यावाल्यांनी सुरू केला आहे. अनेकजण येथे दारू पिण्यासाठी येऊन बसतात. त्यामुळे हे विश्रामगृह आहे की दारुचा अड्डा असाच प्रश्न सामान्य नागरिकांना पडू लागला आहे.
मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा
मराठवाड्यामध्ये येलदरी धरण हे अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण असल्यामुळे व येथे जलविद्युत केंद्र उभारण्यात आलेले असल्यामुळे धरण व विद्युत केंद्र पाहण्यासाठी येलदरी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. मात्र येथे पर्यटकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होतो. त्यामुळे साहजिकच पर्यटकांचे लक्ष येथील विश्रामगृहाकडे जाते. काही आलेले अधिकारी, मंत्री महोदय, आमदार, खासदार, नेते चौकशी करतात विश्रामगृह चालू आहे किंवा नाही. मात्र विश्रामगृह अत्यंत दुरावस्थेत असल्यामुळे या विश्रामगृहात कोणीही जाऊ शकत नाही. शिवाय जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना देखील सध्या येलदरी येथे विश्रामगृह उपलब्ध नसल्यामुळे त्याची देखील मोठी अडचण निर्माण होते. येथील विश्रामगृह उत्पन्नाचे साधन होते. परंतु ते बंद अवस्थेत असल्याने पाटबंधारे विभागावे उत्पन्नही बंद झाले आहेत. अशा या सर्व परिस्थितीत शासनाने व लोकप्रतिनिधींनी येथील विश्रामगृहाकडे विशेष लक्ष देऊन येथील विश्रामगृहाला पुनर्जीवित करून येथील पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.
चार एकर जमिनीचा परिसर
हे विश्रामगृह चार एकर जमिनीचा परिसर असून त्याठिकाणी गार्डन केल्यावर पर्यटकांची वर्दळ वाढू शकते. यामुळे छोटे, मोठे व्यवसाय चालू होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जिंतूर तालुक्याच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. हे विश्रामगृह चालू करून भाडेतत्त्वावर चालविण्यात देण्यात यावे. याच उत्पन्नातून मोठ्या प्रमाणात विभागाला उत्पन्न होऊ शकते. पर्यटकांना गोड पाण्यातील मासळीचा स्वाद घेता येतो.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विश्रामगृहाची दुरुस्ती करावी
विश्रामगृह चालू झाल्यावर अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यामुळे पाटबंधारे विभागाने व शासनाने याकडे लक्ष घालून लवकरात लवकर विश्रामगृहाची दुरुस्ती करावी अशी मागणी पर्यटकांमधून जोर धरू लागली आहे.
या ठिकाणी आढळतात अनेक प्रकारच्या मासळ्या
धरणामध्ये गोड पाणी असल्याने या पाण्यातील मासळीला मुंबई, पुणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच याठिकाणी मच्छी, झिंगा, खेकडे, मरळ, जिलाबी, चिलाटी अशा अनेक प्रकारच्या मासळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतात.