पिंपरणेच्या सरपंचांसह कार्यकर्ते शिवसेनेत
अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना संगमनेर तालुक्यातील जोर्वे गट माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले तशी थोरात गटाला मोठी गळती लागल्याचे चित्र दिसत आहे.
संगमनेर येथील शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालयात जोर्वे गटातील पिंपरणे गावचे सरपंच नारायण मरबळ आणि ग्रामपंचायत सदस्य, तसेच दलित चळवळीतील नेते प्रकाश ऊर्फ काकासाहेब गायकवाड यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे जोर्वे गटात थोरात यांना दुसरा मोठा धक्का बसला आहे. आश्वी येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघापूर येथील थोरात सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यांनी थोरात गटाला सोडचिठ्ठी देत विखे गटात प्रवेश केला.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: महायुतीमध्ये ‘रस्सीखेच’ आणि आघाडीमध्ये ‘बिघाडी’; ‘या’ तालुक्यात अद्याप निर्णय नाहीच
दरम्यान, या मोठ्या धक्क्यातून थोरात गट सावरत नाही, तोच आता पिंपरणे येथील कामधेनू दूध संस्थेचे चेअरमन व दलित चळवळीचे नेते प्रकाश ऊर्फ काकासाहेब गायकवाड यांच्यासह पिंपरणेचे सरपंच नारायण मरभळ, ग्रामपंचायत सदस्य उत्तम राहिंज यांनी आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.
कार्यकर्त्यांची मोठी फळी तालुक्यात उभी
मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जोर्वे गटात जरी माजी आमदार थोरात यांचे वर्चस्व कायम राहिलेले असले, तरी आता तशी परिस्थिती नाही. आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मोठी फळी तालुक्यात उभी राहिली आहे. कामाच्या त्यांच्या शैलीने प्रभावित होत अनेक नवतरुण कार्यकर्ते नव्याने जोडले जात असल्याचे दिसून येत आहे.
गटाचे राजकीय समीकरण बदलण्याची स्थिती
जोर्वे जिल्हा परिषद गटातील अनेक गावे विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील असून, या गावांमध्ये त्यांची मोठी ताकद आहे. जोर्वे गटात असलेल्या अंभोरे गणातील थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सोडचिठ्ठी देत आमदार अमोल खताळ पाटील यांचे नेतृत्व स्वीकारले.
राजकीय समीकरण बदलणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कालावधी असला तरी जोर्वे गटात थोरात यांना मानणारे कार्यकर्ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याने आगामी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलणार आहे.
हेदेखील वाचा : Kolhapur News : स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंत; कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकेसाठी सत्ताधारी-विरोधकांची जय्यत तयारी






