नारायण राणे व नितीन गडकरी यांची भेट
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग रत्नागिरीचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. दोन्ही खासदारांच्या या भेटीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी येथील अनेक प्रश्न मार्गी लागण्याचे शक्यता आहे. प्रामुख्याने मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. राणे व गडकरी या दोन्ही खासदारांमध्ये देखील याबाबत चर्चा झाली आहे. या भेटीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे राहिलेले काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.
नवी दिल्लीमधील नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. या भेटीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे राहिलेले काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावे तसेच पत्रादेवी ते राजापूर भागाचे सुशोभीकरण पूर्ण व्हावे, अशी विनंतीही नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. नारायण राणे यांनी खासदार झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामात लक्ष घातले आहे. यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्यापूर्वी हे काम करुन घ्यावे अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
शहरी भागांमध्ये राहणारी चाकरीमानी लोक गणपती व शिमग्याला कोकणाची वाट धरतात. मात्र त्यांनी ही वाट संपूर्णपणे खड्ड्यांनी भरलेली आहे. त्यामुळे वाहतूक करताना सर्वांना मोठा त्रास होतो. मुंबई – गोवा महामार्गाचे खड्डेमय झालेले रस्त्यांचे अनेक फोटो व व्हिडिओ व्हायरल होत असतात. मागील अनेक वर्षांपासून या हायवेचे काम रखडले आहे. त्यामुळे नारायण राणे व नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर हा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.