
सांगली महापालिका राष्ट्रवादी ताकदीने लढणार, महायुतीला प्राधान्य; पण...
जगदाळे म्हणाले, २००३ ते २००८ ला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढलेली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीने महाविकास आघाडी करून सत्ता देखील मिळवली आहे, जास्त काळ मनपामध्ये राष्ट्रवादीचा महापौर राहिलेला आहे, त्या बळावर आम्ही ३० जागांची मागणी करत आहोत. राष्ट्रवादीने १५ जागा यापूर्वी जिंकल्या आहेत, काँग्रेसच्या १० जागा आम्हाला द्याव्यात कारण तिथला मतदार राष्ट्रवादीला साथ देणार आहे.
मिरजेत सर्वाधिक जागा हव्यात.
जगदाळे म्हणाले, मिरजमध्ये आम्हाला २३ पैकी १९ जागा द्याव्यात. २००५-२००६ आणि २०२० साली मध्ये भाजप नव्हती, त्या ठिकाणी विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत, अनेक कामे झाली आहेत, उर्वरित जागा आम्हाला सांगलीत द्याव्यात प्रभाग क्रमांक ८ आणि १७ सह द्यायव्यात. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस मधून आमच्या पक्षात येण्यासाठी काहीजण इच्छुक आहेत, त्याचा आम्हाला फायदा होईल. ज्या जागा भाजपला मिळाल्या नव्हत्या, त्या जागा आम्ही जास्तीत जास्त मागू.
इच्छुकांकडून मागविणार अर्ज
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी आमचा पक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आपल्या जिल्ह्यातून अल्पसंख्याक असणाऱ्या इद्रिस नायकवडी यांना अजित पवार यांनी संधी दिली आहे. मनपामध्ये महायुतीची सत्ता येईल असा आम्हाला विश्वास आहे. आजपासून आम्ही इच्छुकांचे अर्ज मागवीत आहोत, १२ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल, अशी माहिती जगदाळे यांनी दिली.
महायुतीला प्राधान्य, मात्र स्वबळाचीही तयारी
सर्व पक्ष एकत्र बसून युती करू, त्यानंतर युतीचा अधिकृत निर्णय होईल. प्रत्येक प्रभागात आमची तयारी आहे, मात्र महायुतीलाच आमचे प्राधान्य असेल. २० जागा न मिळाल्यास आम्ही पूर्ण ताकदीने स्वबळावर निवडणूक लढू. भाजपच्या ४१, मदनभाऊ गट ७, उर्वरित जागा आहेत, त्यामुळं आमचं जागा वाटप होईल, जागा मागत असताना सक्षम उमेदवार आणि सर्व्हेक्षण याबाबत राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना असे वाटप होईल, निवडून येण्याची क्षमता हीच वाटपासाठी अट असेल.
अवैध धंदेवाले, गुन्हेगारांना उमेदवारी देऊ नये
महायुतीसह सर्वच पक्षांनी मनपा निवडणुकीत अवैध धंदेवाल्यांना, गुन्हेगारांना उमेदवारी देऊ नये, असे आवाहन जगदाळे यांनी केले, शहर भयमुक्त करण्यासाठी व शांतता राखण्यासाठी सर्वच पक्षांनी ही भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.