
Illegal Moneylending
बोर्डी (वा.) डहाणू तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध खाजगी सावकारीच्या जाळ्याने आणखी एका कष्टकरी उद्योजकाचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अमानुष व्याजदर, सातत्याचा मानसिक छळ, शिवीगाळ व धमक्यांना कंटाळून एका डायमेकिंग व्यवसायिकाने आत्महत्या केल्याचे उघड झाले असून, आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमुळे अवैध सावकारीचे भयावह वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. या प्रकरणी पाच खाजगी सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा वाणगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दैनिक नवराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून दि. १७ डिसेंबर रोजी ‘डहाणूमध्ये अवैध खाजगी सावकारीचे वाढतेय जाळे’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल प्रशासनाने घेतल्यानंतर अवैध सावकारीविरोधातील कारवाईला गती मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील एका कष्टकरी उद्योजकाच्या आत्महत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी जय किशोर दवणे चिंचणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील कै. किशोर दवणे हे डायमेकिंग व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
व्यवसाय वाढीसाठी त्यांनी नवीन वायरकट मशिन खरेदी केली होती. तसेच, वर्कशॉपचे नूतनीकरणही केले होते. यासाठी विविध ठिकाणांहून कर्ज घेतले होते. मात्र, अलीकडील काळात व्यवसायात आलेल्या मंदीमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य होत नव्हते. या आर्थिक अडचणीच्या काळात त्यांनी काही खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. घेतलेल्या पैशांपेक्षा अधिक रक्कम परत देऊनही व्याज थकल्याचे सांगत संबंधित सावकारांकडून सातत्याने फोनवरून मानसिक छळ, शिवीगाळ व धमक्या दिल्या जात होत्या. चारचौघांत अपमान केल्याने कै. दवणे यांचा मानसिक ताण वाढला होता. अखेर या त्रासाला कंटाळून दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दि. ११ ऑगस्ट रोजी घराची साफसफाई सुरू असताना बेडखाली तीन पानी सुसाईड नोट आढळून आली. या सुसाईड नोटमध्ये अवैध व्याज व्यवहार, सातत्याचा मानसिक छळ व धमक्यांमुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले असून, नितीन उमराव जैन वाणगाव, इंद्रदेव विश्वनाथ गुप्ता चिंचणी, तुषार हरेश साळसकर चिंचणी, अरविंद रखमाजी पाटील उर्फ पिंटा अंधेरी, मुंबई व मंगेश भालचंद्र चुरी चिंचणी या पाच खाजगी सावकारांची नावे स्पष्टपणे लिहिण्यात आली आहेत. यानंतर मृताचा मुलगा जय दवणे यांच्या तक्रारीवरून दि. २० डिसेंबर रोजी वाणगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.