नवी मुंबई / सावन वैश्य : आगामी गणेशोत्सव काळात मुस्लिम बांधवांचा ईद सण देखील येत आहे. त्यामुळे नवी मुंबईत शांतता अबाधित ठेवून दोन्ही धर्मांच्या बांधवांनी आपापले सण शांततेत साजरी करण्यासाठी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत घेण्यात आलेल्या या दोनही समाजाच्या समन्वय बैठकीत परिमंडळचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी मार्गदर्शन केले.
नवी मुंबई शहर हे शांततेच्या दृष्टीने इतर शहरांपेक्षा अव्वल स्थानी असलेले शहर आहे. त्यामुळे या शहरात देशातील कानाकोपऱ्यातील, विविध जाती धर्माचे नागरिक या नवी मुंबईत वास्तव्यास पसंती दर्शवतात. त्यामुळे नवी मुंबई या शहराला प्रती भारत असे देखील संबोधले जाते. या शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. कारण येथील रहिवासी एकमेकांच्या धर्माच्या आदर करतात, तसंच एकमेकांच्या सणात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात, त्यामुळे या शहरात शांतता अखंड नांदत आहे. जर एखादी अप्रिय घटना घडली तर पोलीस प्रशासन देखील कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेत परिस्थिती यशस्वीपणे हाताळतात.
येत्या 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्याने सर्वत्र मोठ्या भक्ती भावात गणरायाचे आगमन होणार आहे. तसेच 5 सप्टेंबरला मुस्लिम बांधवांचा ईद हा सण देखील आहे. हे दोन्ही सण एकत्रच असल्याने, हे सण साजरे करताना कशाप्रकारे साजरे करावे, तसेच कोणकोणत्या उपाययोजना करत काय खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व ईद कमिटीचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक, वाशी सेक्टर 6, मधील साहित्य मंदिर सभागृहात घेण्यात आली.
या बैठकीला परिमंडळचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी मार्गदर्शन करत, दोन्हीही समाज बांधवांनी आपापले सण साजरे करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी, जेणेकरून आपल्या सणांना गालबोट लागणार नाही व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत माहिती दिली.
नवी मुंबईतील जनता ही शांतताप्रिया आहे. त्यामुळे कोणताही गैरप्रकार काही घडणार नाही याबाबत काळजी घ्यावी. तसेच एखाद्या समाजकंटकाकडून जातीय धर्मात द्वेष निर्माण केला जात असेल, तर त्या व्यक्तीस तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या ताब्यात द्यावे, अथवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. मात्र कायदा हातात घेऊन कोणीही उत्सवाच्या रंगाचा बेरंग करू नये असे आवाहन देखील पोलीस उपायुक्त डहाणे यांनी यावेळी दोन्ही समाज बांधवांना केल आहे.
या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त पंकज डहाने, सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस, वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय चौधरी, परिमंडळ मधील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे विभाग अधिकारी सुखदेव येडवे, महावितरणचे सहाय्यक अभियंता अरविंद घासे, मेहुल बागुल, अश्विन कुमार धसवडीकर, अग्निशमन दलाचे अधिकारी रोहन कोकाटे, तसेच नवी मुंबई पालिका रुग्णालयाचे डॉक्टर प्रकाश राठोड हे उपस्थित होते.