KDMC मध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार , नवीन सिंग यांचा दावा (फोटो सौजन्य-X)
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेती गेल्या २५ वर्षापासून शिवसेना भाजपची सत्ता होती. सत्ताधारी पक्ष सत्तेवर असल्यापासून आत्तापर्यंत नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी काय केले ? असा संतप्त सवाल काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव नवीन सिंग यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाचा नाकर्तेपणा पाहता आगामी महापालिका निवडणूकीनंतर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा महासचिव सिंग यांनी केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत १९९५ पासून शिवसेना भाजपची सत्ता आहे. मधली अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता वगळता महापालिकेत गेल्या २५ वर्षापासून शिवसेना भाजपची सत्ता आहे. २०२० मध्ये कोरोना महामारी आल्याने महापालिकेच्या निवडणूका पार पडल्या नाहीत. आत्ता न्यायालयाने महापालिकेचया निवडणूका घेण्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर महापालिकेने निवडणूकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरु केले आहे. लवकर महापालिकेच्या निवडणूका होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या २५ वर्षात नागरीकांना सत्ताधारी साध्या मूलभूत सोयी सुविधा देऊ शकले नाही.
आजही शहरात दर वर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य असते. खड्डे बुजविण्यासाठी यंदा ३० कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. नागरीकांचा पैसा खड्डयात टाकला जात आहे. शहराला पुरेसा पाणी पुरवठा केला जात नाही. पाणी पुरवठ्याचे नियोजन नाही. विशेष म्हणजे आज केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. तरी देखील कल्याण पूर्वेतील पाणी समस्या सोडविण्यासाठी भाजपला रास्ता रोको आंदोलन करावे लागते. हेच आंदोलन अन्य कोणत्या पक्षाने केले असते तर त्याला कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत पोलिस प्रशासनाने मज्जाव केला असता.
भाजप सत्तेत असल्याने पोलिसांनी कारवाईकरीता हात आखडता घेतला. ही वस्तूस्थिती कोणी नाकारु शकत नाही. कल्याण डोंबिवलीतील नागरीक नागरी समस्यांनी त्रस्त आहे. त्या समस्या सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीत महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा सिंग यांनी केला आहे.
दरम्यान राज्याच्या राजकारणात सध्या आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणीही राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने आत्तापासूनच व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे.