मनोज जरांगेची अवकात असेल तर...; गाडी जाळल्यानंतर नवनाथ वाघमारे संतापले
जालना : जालन्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची चारचाकी स्कॉर्पिओ गाडी एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली आहे. रात्री उशिरा तोंडाला रुमाल बांधलेली एक व्यक्ती नवनाथ वाघमारे हे वास्तव्यास असलेल्या इमारतीबाहेर आली आणि त्याने पार्किंगमध्ये उभी असलेली वाघमारे यांची गाडी पेटवून दिली. जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते 11 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. गाडी जाळल्यामुळे ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनीच गाडी जाळली असा दावा नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. मनोज जरांगेची अवकात असेल तर त्याने स्वतः रस्त्यावर यावं असं नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज दिलं आहे. दुसऱ्याला समोर करून हे कृत्य करणं चुकीचं आहे. जरांगे पादरा प्राणी आहे असा टोला त्यांनी लगावला.
या सगळ्यामागे मनोज जरांगे पाटील आहेत, असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला. “यापूर्वी त्यांनी अनेक मराठा तरुणांना असच फसवलं, हल्ले करायला लावून स्वतः अंतरवलीच्या बिळात जाऊन लपायच” असं नवनाथ वाघमारे म्हणाले. “आम्ही खरं बोलतो म्हणून यांच्या बुडाला आग लागते. मी, शरद पवार, रोहित पवार राजेश टोपे या सर्व नेत्यावरती बोलल्यामुळे यांच्या बुडाला आग लागली. जरांगेने जास्त माज दाखवला तर आम्ही जरांगेच्या गाड्या अडवू, जरांगेच्या घरावर जायला सुद्धा आमची पोर घाबरणार नाहीत” असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला.
कोण आहेत नवनाथ वाघमारे?
नवनाथ वाघमारे हे मागील काही वर्षांपासून ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करत आहेत. त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जाहीरपणे विरोध करत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होऊ नये, यासाठी ते आवाज उठवत आहेत. जालन्यात धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी मागील पाच ते सहा दिवसांपासून धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. बोराडे यांची भेट घेण्यासाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते हे काल आले होते. या भेटीदरम्यान त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर बरीच टीका केली, तसेच सुप्रिया सुळे, माजी आमदार व माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावरही टीका केली. तसंच जरांगे पाटील यांची तुलना त्यांनी बुटावर असलेल्या धुळीसोबत केली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे चित्र असताना काल रात्री 11 वाजेच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी ही अज्ञात व्यक्तीने जाळली आहे. दरम्यान, नवनाथ वाघमारे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून लवकरच चारचाकी पेटवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं जाईल, अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.