sharad pawar
छत्रपती संभाजीनगर : राज्यात कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये दंगलीसदृश्य (Maharashtra Riot) वातावरण आहे. या प्रवृत्तीला सत्ताधारी प्रोत्साहन देत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. राज्यात दंगली घडवल्या जात असल्याचा गंभीर आरोपही शरद पवार यांनी केला आहे.
ओडिशा आणि काही राज्यांत चर्चेसवर हल्ले झाले. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय असतो. जर कुणी काही चुकीचं केलं असेल तर पोलिसी कारवाई व्हावी. त्यासाठी धार्मिक स्थळांवर हल्ले कशासाठी, असा सवाल पवारांनी केलाय. हे जे घडतं आहे, हे सहजासहजी किंवा एकट्या दुकट्याचं काम नाही. यामागे काही विचारधारा आहेत. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही, अशी टीका पवार यांनी भाजपावर नाव न घेता केली आहे.
नेमंक काय म्हणालेत शदर पवार?
राज्यात नगरमध्ये आणि कोल्हापुरात काही तरी झालंय. मोबाईलवर कुणीतरी मेसेज पाठवला. त्या मेसेजसाठी लगेच रस्त्यावर उतरुन त्याला धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही. सत्ताधारी पक्ष आहे, तो अशा सगळ्या गोष्टांनी प्रोत्साहित करत आहे. राज्यकर्त्यांची आणि सरकारची जबाबदारी ही राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं, ही आहे. राज्यकर्तेच जर उतरायला लागले, त्यांचे कार्यकर्तेच जर उतरायला लागले, त्यातून जातींमध्ये कटुता निर्माण व्हायला लागली, तर हे काही चांगलं लक्षण नाहीये, असं शरद पवार म्हणाले आहेत.
हे सगळं घडवण्यात येतंय : शरद पवार
छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणी मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो दाखवला, त्यावरुन पुण्यात दंगल घडवण्याचं काय कारण आहे, असा प्रश्न पवारांनी विचारलाय. त्यासाठी पुण्यात आंदोलन करण्याचं काय कारण आहे. फोटो दाखवला तर त्यावरुन एवढं सगळं करण्याचं काय कारण आहे. फोटो दाखवला, तर त्याचं कुणाला काय पडलंय, असंही पवार म्हणालेत.