amol kolhe on mazi ladki bahin yojana
परभणी : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. मात्र त्यापूर्वीच प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महायुतीने लाडकी बहीण योजनेवरुन प्रचारास सुरुवात केली आहे. तर शरद पवार गटाने शिवसन्मान यात्रा सुरु केली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार रोहित पवार जोरदार प्रचार करत आहेत. परभणीमध्ये शिवस्वराज्य यात्रा असताना खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनवरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी देखील महायुतीवर निशाणा साधला आहे. अमोल कोल्हे म्हणाले, “आमच्या मतदारसंघांमध्ये गुलाबी यात्रा निघाली. मात्र, या गुलाबी यात्रेला भाजपचे नेते काळे झेंडे दाखवत आहेत. लाडकी बहीण कोणाची हेच कळेनासं झालं आहे. मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्र्यांची हेच कळेनासं झालं आहे. विधानसभेच्या निवडणुका पुढे टाकण्याचं कारस्थान रचले जाते. त्यांना कळून चुकलं आहे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. लोकसभा झांकी हे विधानसभा बाकी है,” असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यासह महायुतीला टोला लगावला.
शिवस्वराज्य यात्रा (दिवस नववा)
📍जिंतूर, परभणीमतांची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, हे आता बहिणींनाही कळलंय. शिक्षकांची ६७ हजार पदे रिक्त आहेत, ५६ हजार शिक्षण सैवकांची पदे रिक्त आहेत. बहुजन समाजाच्या नोकऱ्यांवर सरकारने गदा आणली आहे. त्यात येणारे उद्योग गुजरातला जात आहेत, पण… pic.twitter.com/MC0mlBFeE5
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 17, 2024
तुतारी अशी वाजवा की कमळाची पानं गळून पडली पाहिजेत
पुढे अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत महायुती फटकारले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “मतांची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, हे आता बहिणींनाही कळलंय. शिक्षकांची ६७ हजार पदे रिक्त आहेत, ५६ हजार शिक्षण सैवकांची पदे रिक्त आहेत. बहुजन समाजाच्या नोकऱ्यांवर सरकारने गदा आणली आहे. त्यात येणारे उद्योग गुजरातला जात आहेत, पण महीयुतीच्या एकाही नेत्यात हिंमत नाही डोळे रोखून त्याचा जाब विचारायचा. राजकीय क्षेत्राची अशी नासाडी करण्यात आली आहे. ५० खोक्यांसारखी बाजारू पद्धत महाराष्ट्र खपवून घेत नाही. आता विधानसभेला तुतारी अशी वाजवा की कमळाची पानं गळून पडली पाहिजेत,” असा घणाघात अमोल कोल्हे यांनी केला आहे.