Ncp obc leader Raj Rajapurkar target cm devendra fadnavis over obc reservations
बुलढाणा : राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा गाजणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर आता ओबीसी नेत्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूरमधून मंडल यात्रेला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल (दि.18) या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी कमंडल दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुलं चॅलेंज दिलं आहे. माझा खुला आरोप आहे की, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणि तुमच्या पक्षाने ओबीसींचं आरक्षण नाकारलं होतं असे राजापूरकर म्हणाले आहेत. आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने काढण्यात आलेली ओबीसी जनजागरण मंडल अभियान यात्रा शेगावात पोहोचली होती. यावेळी ते बोलत होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी जनजागरण मंडल अभियान यात्रेला शरद पवार यांच्या उपस्थितीत नागपूर १० ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली. ही यात्रा महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यात जाणार आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात देखील ही यात्रा पोहोचली आहे. यावेळी ओबीसी बांधवांकडून या यात्रेचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी ओबीसीच्या घोषणा देत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे, अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणि तुमच्या पक्षाने ओबीसींचा आरक्षण नाकारलं होतं, हे वास्तविक सत्य असल्याचे मत राज राजापूरकर यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला ही प्रत्युत्तर दिले. शेगाव पोचल्यानंतर सर्वप्रथम श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे मंडळी यात्रेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. यावेळी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, माजी आमदार रेखा खेडेकर, सहकार नेते पांडुरंग पाटील, प्रसन्नजीत पाटील, संगीत भोंगळ आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गणेशोत्सव काळात जरांगे पाटील मुंबईत होणार दाखल
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी येत्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 29 ऑगस्टला मुंबईत दाखल होणारच, कोणीही आडवं आलं तरी थांबणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबई सोडणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळेल, अशीही चर्चा सुरु आहे.