रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय? (फोटो सौजन्य-X)
Mumbai Rain Update In Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची परिस्थिती वाईट आहे. आजही सततचा मुसळधार पावसामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. मंगळवारी सकाळपासून पाऊस आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. याचदरम्यान आता हवामान विभागाकडून नवीन अलर्ट जारी करण्यात आला.
मंगळवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. परिणाणी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला आहे. अशातच आता हवामान विभागाकडून नवीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.
१८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबईत किती पाऊस पडला
पश्चिम उपनगर:
१. चिंचोली अग्निशमन केंद्र – ३६१ मिमी.
२. कांदिवली अग्निशमन केंद्र – ३३७ मिमी.
३. दिंडोशी कॉलनी महानगरपालिका शाळा – ३०५ मिमी.
४. मागठाणे बस डेपो – ३०४ मिमी.
५. वर्सोवा पंपिंग स्टेशन – २४० मिमी.
शहर:
१. एसडब्ल्यूडी वर्कशॉप, दादर – ३०० मिमी..
२. बी. नाडकर्णी महानगरपालिका शाळा, वडाळा – २८२ मिमी.
३. फोर्सबेरी रोड जलाशय, एफ/दक्षिण वॉर्ड – २६५ मिमी.
४. प्रतीक्षा नगर महानगरपालिका शाळा, सायन – २५२ मिमी.
५. सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळा, वरळी – २५० मिमी.
पूर्व उपनगरे:
१. चेंबूर अग्निशमन केंद्र – २९७ मिमी.
२. इमारत प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी – २९३ मिमी.
३. पासपोली महानगरपालिका शाळा, पवई – २९० मिमी.
४. वीणा महानगरपालिका शाळा – २८८ मिमी.
५. टागोर महानगरपालिका शाळा – २८७ मिमी.
मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसामुळे गाड्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे ट्रॅकवर लोकांची मोठी गर्दी जमली होती. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ठाण्यात लोक रेल्वे ट्रॅकवर आले. मुसळधार पावसात जीव धोक्यात घालून अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवरूनच ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १८ ते २२ ऑगस्ट २०२५ या पाच दिवसांत कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात समुद्रातील वाऱ्याचा वेग ४५ ते ५० किलोमीटर प्रतितास असेल, जो ६५ किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे समुद्र खूप खवळलेला असेल. मच्छिमारांनी त्यांच्या सुरक्षेसाठी समुद्रात अजिबात जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. या वादळी वाऱ्यांमुळे कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी, मच्छिमार संस्था आणि बोटींच्या मालकांना तातडीने सूचना देण्यास सांगितले आहे. तसेच, पुढील काळातही हवामान विभागाकडून येणाऱ्या नवीन माहितीकडे लक्ष ठेवावे आणि त्याप्रमाणे काळजी घ्यावी, असेही कळवण्यात आले आहे.